10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचं निमित्त
Edited by: विनायक गांवस
Published on: October 15, 2025 14:46 PM
views 16  views

सावंतवाडी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे 3 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील 10,000 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने सोडला आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्व विक्रम असणार आहे, असा दावा एस.एम.देशमुख यांनी केला आहे.

3 डिसेंबर 1939 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची स्थापन झाली. गेली दहा वर्षे 3 डिसेंबर हा दिवस राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून पाळला जातो. पहिल्या वर्षी 3000 पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली. त्यानंतर ही संख्या क्रमश: वाढत गेली. गेल्यावर्षी 8000 पत्रकारांची तपासणी केली गेली. वाढता प्रतिसाद पाहून यावर्षी 10,000 पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

याबाबतची माहिती पत्रकार परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हरिश्चंद्र पवार यांनी दिली आहे. परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांनी स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि डॉक्टरांच्या मदतीने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी शिबिरं घ्यावीत असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, आरोग्य कक्षाचे दीपक कैतके आदिंनी केले आहे. आरोग्य तपासणीत ज्या पत्रकारांना गंभीर आजार असतील त्यांच्या पुढील उपचाराची व्यवस्था परिषदेच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली.