
दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सहा मतदार संघाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले आहे. सभापती पद हे सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झाले होते. आज सदस्य पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणात प्रस्तापितांचे पत्ते गुल झाल्याचे दिसत आहेत. झरेबांबर, कोनाळ व माटणे मतदार संघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे पंचायत समीतीवर महिला राज होणार असून या तीन मतदार संघातून कोण सभापती पदावर बसणार हे पाहण तितकंच महत्वाच आहे.
येथील दोडामार्ग तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी आरक्षण सोडत परिविक्षाधीन प्रांताधिकारी लक्ष्मण कसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली. यावेळी प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने उपस्थित होत्या. स्पृहा सुमित दळवी या शालेय विद्यार्थीनीच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढली. साटेली-भेडशी येथे मागील वेळी आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी होते. त्यावेळी शिवसेनेच्या सुनंदा धर्णे या निवडून येत उपसभापती पद भूषविले होते. मात्र यंदा या गणात ओबीसी सर्वसाधारण आरक्षण लागू झाल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे. कोलझर गण मागच्या वेळेस नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होता. शिवसेनेचे गणपत नाईक हे निवडून आले होते. मात्र यंदा हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. मणेरी हा गण मागच्या वेळेस सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित होता. त्यावेळी शिवसेनेच्या धनश्री गवस निवडून आल्या होत्या. मात्र आता हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.
कोनाळ येथून मागच्या वेळेस ना.मा.प्र. महिला हे आरक्षण होते. येथून संजना संदिप कोरगावकर या विजयी झाल्या होत्या. आता येथे सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. झरेबांबर येथे मागीलवेळी आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते आणि भाजपाचे लक्ष्मण (बाळा) सखाराम नाईक यांनी विजयी झाले होते. यंदा या गणात सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने त्यांचाही येथून पत्ता कट झाला आहे. माटणे येथे यापूर्वी भाजपाचे भरत जाधव हे सदस्य म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक झाली व ठाकरे शिवसेनेचे बाबुराव धुरी विजयी झाले होते. आता तो गणही सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी सक्षम अशा महिला उमेदवारांची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांना करावी लागणार आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी - पंचायत समितीच्या सहा मतदार संघांचे आरक्षण जाहीर झाल्या नंतर झरेबांबर, कोनाळ, माटणे या मतदार संघात सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्या नंतर सर्वच पक्षामधून नवीन चेहेरे समोर येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.