
चिपळूण : चिपळूण वनपरिक्षेत्रातील रामपूर नियत क्षेत्रामधील मौजे तनाळी पैकी राधाकृष्णवाडी येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाच्या बचाव पथकाने सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा बिबट्या मादी जातीचा असून त्याचे अंदाजे वय दोन ते अडीच वर्षे आहे. वन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राधाकृष्णवाडी येथील सहदेव धोंडू बाईत यांच्या घरामागच्या विहिरीत पडलेला बिबट्या सौ. सानवी सुरज बाईत यांनी सकाळी ९.०० वाजता पाहिला. त्यांनी ही माहिती पोलीस पाटील राजेश थरवळ यांना दिली. त्यांनी तात्काळ वनविभागास माहिती सांगितली. त्यानंतर तत्काळ वनपरिमंडळ अधिकारी एस.एस.सावंत, वनपरिमंडळ अधिकारी, फिरते पथक रत्नागिरी- चिपळूणचे जी. एम. पाटील, वनरक्षक फिरते पथक दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर राहूल गुंठे, वनरक्षक अनंत मंत्र व वाहनचालक नंदकुमार कदम, संजय अंबोकर यांनी वन विभागाचे बचाव पथक सामग्री आधुनिक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्यास काही वेळातच सुखरूप बाहेर काढले.
विहिरीमधून बाहेर काढल्यानंतर बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. कणसे यांनी पाहणी करून तो सुस्थितीत असल्याचे खात्री केली. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत अहवाल दिला. त्यानुसार वन विभागाचे बचाव पथकाने सदर बिबट्यास सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांचे समक्ष नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. बचाव पथकास विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, व वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांनी मार्गदर्शन केले.