
दापोली : दापोली तालुक्यामध्ये ६५ टक्के कुणबी समाज असून गेल्या अनेक वर्षात एकाही राजकीय पक्षाने या समाजाला विधानसभेची उमेदवारी दिलेली नाही ती उमेदवारी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संतोष सोनू अबगुल यांच्या रूपाने दिली असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
२६३ दापोली विधानसभा मतदारसंघात यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपला उमेदवार या निवडणुकीसाठी उभा केला असून त्याचा प्रचाराचा शुभारंभ झाल्यावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खेडेकर बोलत होते. ते म्हणाले, दापोली विधानसभा मतदारसंघात मनसेचे कार्य हे खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. हा मतदारसंघ तसा सौजन्यशील आहे. या मतदारसंघात अनेकांनी प्रतिनिधित्व केले परंतु या मतदारसंघाची जशी प्रगती झाली पाहिजे होती तशी ती झालेली नाही. गेली २० वर्ष मी आणि तिन्ही तालुक्याच्या माझ्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी मनसेची घौडदौड सुरूच ठेवली आहे. यापूर्वी दापोली नगरपंचयतीवर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार नगरसेवक निवडुन गेले होते. खेड नगरपालिका सातत्याने तीन वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राहिलेली आहे. पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा सहकारी संस्था असोत प्रत्येक ठिकाणी पक्षाचं प्रतिनिधित्व आहे. आणि म्हणूनच दापोली मतदार संघातीलच एक तरुण उमद्या उमेदवाराला याठिकाणी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा मतदार आजही दापोली मध्ये आहे. म्हणूनच संतोष अबगुल यांना याठिकाणी पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
संतोष सोनू अबगुल एका गरीब आणि शेतकरी कुटुंबातील असून एका सामान्य कुटुंबातील सदस्याला पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. ही फार मोठी अभिमानाचीच गोष्ट आहे. संतोष अबगुल हे कुणबी समाजच प्रतिनिधित्व करत आहेत. या कोकणामध्ये ६५ टाके समाज हा कुणबी समाज आहे. आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देतो अश्या प्रतिज्ञा केल्या होत्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही पक्षाने या समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही. महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्यांनी या विधानसभा निवडणुकीत कुणबी समाजाला प्रतिनिधींत्व देऊन संतोष अबगुल याना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातील संपूर्ण कुणबी समाज अबगुल यांच्या पाठीशी उभा आहे. याचाच फायदा आम्हाला या निवडणुकीत होणार आहे.
अबगुल यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील चुरस वाढलेली असून येथील गणिते देखील बदलली आहेत. या मतदार संघामध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. याठिकाणी कोणत्याही पक्षाचा उमेदवार आम्ही अमुक मताधिक्याने निवडून येऊ असे छातीठोक सांगू शकत नाही. पंरतु सध्याच वातावरण हे सामान्य उमेदवाराच्या बाजूने दिसत असून आमचाच उमेदवार याठिकाणी विधानसभेवर निवडून जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आमच्याकडे धनशक्ती जरी नसली तरी आमच्याकडे जनशक्ती आहे तसेच आम्ही प्रस्थापित नसून आम्ही विस्थापित आहोत. जनतेला आता बदल अपेक्षित आहे. सामान्य जनतेला सामान्य माणूसच हवा आहे. तशा पध्दतीने आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहोत आम्हाला या निवडणुकीत निश्चित यश मिळणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. यापुढे घराणेशाही असो किंवा कुटुंबशाही असो किंवा ज्यांना फक्त आम्हीच निवडणूक लढवायची अस ज्यांना वाटतंय त्याना आता घरी पाठवायची वेळ आलेली आहे. मतदार हा शांत आहे ते योग्य उमेदवाराच्या समोरील बटन दाबून योग्य उमेदवारालाच निवडून देणार आहे याची देखील खात्री आम्हाला आहे असे खेडेकर यांनी सांगितले.