
वेंगुर्ले : वेंगुर्ला ते मालवण सागरी महामार्गावर दाभोली येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
वेंगुर्ला-कोरजाई -मालवण या सागरी मार्गावर दाभोली भागात खूप जास्त प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने रस्ता संपूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. या मार्गे जाणाऱ्या सर्व वाहनांना ये-जा करण्यासाठी भयंकर त्रास होत आहे. दाभोली हा भाग दुर्गम असल्याने रस्ता वळणावळणाचा आहे. त्यात रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनांना भयंकर अडथळा होतो व अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तरी आपण या सर्व बाबींचा विचार करून सदर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी विनंती निवेदनाद्वारे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता वेंगुर्ला यांच्याकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकामचे कनिष्ट अभियंता राहुल आडोळे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी शिवसेनेचे आडेली जि प मतदार संघ विभागप्रमुख मितेश परब, आडेली ग्रा प सदस्य सुधीर धुरी, ग्रामस्थ सिद्धेश टेमकर, सतीश मांजरेकर व श्री धरणे आदी उपस्थित होते.










