
देवगड : देवगड - शिरगाव ते नांदगाव व वरेरी डोंगरेकरवाडी ते वरेरी फाटा रस्त्याची सद्या अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. हा रस्ता तात्काळ पुढील १५ दिवसात दुरुस्ती न केल्यास आमरण उपोषणास बसणार असलेबाबत लेखी निवेदन वरेरी बौद्धवाडी येथील रहिवासी तथा समाजसेवक संतोष बापू वरेरकर यांनी कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड यांजकडे दिले आहे.
दरम्यान आपल्या लेखी निवेदनात वरेरकर म्हणतात, मी अर्जदार संतोष बापू वरेरकर रा. वरेरी बौद्धवाडी ता. देवगड जि. सिंधुदुर्ग एक समाजसेवक असून असून गेली कित्येक वर्षे समाजसेवेचे काम करीत आहे. निदर्शनास आले आहे की, वरेरी डोंगरेकरवाडी येथील घाटी ते वरेरी फाटा पर्यंत रस्ता पूर्णतः वाहतुकीस धोकादायक व जीवितहानीस हानिकारक झालेला आहे. सदर रस्त्यावरील आपल्या कार्यालयातून दुरुस्ती संदर्भात शासनाचे आदेश आले आहेत असे आम्हाला तोंडी सांगितले जात आहे. तसेच शिरगाव ते नांदव पर्यंत जाणारा रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे व रस्त्यावरील डांबर जावून उदा. कोळोशी ते नांदगाव या रस्त्यावरील डांबर जावून रस्ता वाहतुकीस अतिशय धोकादायक झालेला आहे. तसेच तळेबाजार हायस्कूल ते बाजारपेठ या रस्त्यावर गतीरोधक बसविण्यातबाबत आपल्याकडे वारंवार पत्रव्यवहार केलेला असूनही त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. सदरच्या रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघात आलेल्या असून त्यात शाळेच्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे अपघात झालेले आहेत, होत आहेत.
तरी आपल्या कार्यालयात हे पत्र प्राप्त होताच दुरुस्तीची व्यवस्था करून लोकांना होणारा त्रास दूर करण्यात यावा. सदर अर्जाचा विचार आपण १५ दिवसात केल्यास आपल्याला कुठल्याही प्रकारची सूचना न करता मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे. उपोषण कालावधीत माझ्या प्रकृतीमध्ये काही बरेवाईट झाल्यास त्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहणार आहात, याची आपण नोंद घ्यावी.