
बांदा : दांडेली-वरचावाडा रस्त्याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचा नाहक त्रास येथून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. खड्डेमय धोकादायक रस्ता निर्धोक करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी केली. तसेच प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी दांडेली-वरचावाडा ग्रामस्थांनी केली आहे.
वरचावाडा भाग डोंगराळ असल्याने या ठिकाणी रानटी प्राण्यांचा वावर नेहमी असतो. त्यामुळे मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी दुचाकीचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु खड्डेमय रस्त्यात अनेक वेळा दुचाकी अडकून अपघातही झाला मात्र प्रशासनाचे याकडे लक्ष गेले नाही. वरचावाडा रस्त्यासाठी प्रशासनाकडे निधी नाही की कशामुळे काम रखडत आहे याचे नेमके कारण काय असा सवाल ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, ग्रामस्थांच्या एकजुटीने श्रमदानातून केलेली डागडुजी प्रशासनाच्या निदर्शनास येणार काय, असे सांगत संपूर्ण धोकादायक रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी दांडेली-वरचावाडा ग्रामस्थांनी केली आहे.