
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील आनंदवाडी स्मशानभूमीच्या नूतनीकरणाच्या कामाला गती मिळाली असून या कामासाठी नगरसेवक संतोष तारी यांनी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज संबंधित ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष पाहणी व मोजणी केली.
यावेळी नगरसेवक संतोष तारी, आनंदवाडी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कोयंडे, तात्या धुरी, हेमंत कुबल, संजय बांदकर, गुरुनाथ तारी, गणेश कुबल, संतोष कोयंडे तसेच नगरपंचायत अभियंता विवेक खोत आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, आनंदवाडी परिसरातील ग्रामस्थांनीही देवगड-जामसंडे शहर विकास समन्वय समितीकडे स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत आपली व्यथा मांडली होती.
नगरसेवक संतोष तारी यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आनंदवाडी स्मशानभूमीच्यानूतनीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कामामुळे स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा अधिक सक्षम व सुस्थितीत होण्यास मदत होणार आहे.आज करण्यात आलेल्या मोजणीमुळे या स्मशान भूमीच्या अंमलबजावणी प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे मानले जात असून, लवकरच निधी मंजुरी व पुढील कार्यवाहीला गती मिळेल,अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच स्मशानभूमीचे नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.










