
कणकवली : राज्याच्या विद्यमान मंत्री मंडळातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्याबाबतीत अश्लील टीका करून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशातील तमाम महिला वर्गाचा अपमान करून संसदीय संविधानाची पायमल्ली केली आहे. एका संविधानिक घटनेनुसार राज्य मंत्रिमंडळात मंत्री पदावर असणाऱ्या अब्दुल सत्तार यांना ते शोभत नाही. सदर घटना ही लोकशाही प्रधान देशात भूषणावह नाही. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे निषेध आंदोलन होत आहे, तसेच अशा बेजबाबदार मंत्र्यांची राज्य मंत्रिमंडळातून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांनी केली आहे.
तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात येत आहे, त्याप्रमाणे त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांनी केली आहे.