
सिंधुदुर्ग : जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख असलेले अनिल व्हटकर यांना त्यांच्या पदावरून तात्काळ हटवा, अशी जोरदार मागणी भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी केली आहे. आंबोलीमध्ये एक लाखाची दारू पकडली. ही दारू दाणोली चेक पोस्ट करून गेलीच कशी? असा सवाल दीपक नारकर यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक पोलिसांना हटवून परजिल्ह्यातील जे पोलीस आहेत, त्या पोलिसांना या ठिकाणी व्हटकर हे ड्युटी लावून स्थानिकांवर अन्याय करत आहेत. व्हटकर आपल्या मर्जीतील परजिल्ह्यातील पोलीसांना याठिकाणी ड्युटी लावत आहेत. तर जिल्हय़ातील स्थानिक पोलीसांची येथील ड्युटी काढून अन्य ठिकाणी ड्युटी लावत असल्याने मनमानी कारभार करत आहेत.
कोल्हापूर येथे सेवेत असताना हुक्का पार्लरसारखा प्रकारामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिस अधिकाराला वाहतूक सारख्या महत्त्वाच्या पदावर न ठेवता तात्काळ त्यांना हटवावे. या जिल्ह्यात तस्करी होण्यासाठी व्हटकर आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत, असा गंभीर आरोप करत अनिल व्हटकर यांना न हटवल्यास आंदोलनाचा इशारा भाजपचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबतचे निवेदन दिले असल्याची माहिती दीपक नारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आठ दिवसात जर का व्हटकर यांना हटवण्याचा निर्णय झाला नाही तर २० मार्चनंतर जनआंदोलन करू, असा इशारा नारकर यांनी दिला आहे.