नारायण राणेंच्या स्वप्नातील बँकेला नवी गती ; दळवींच्या नेतृत्वात प्रगतीचा वेग

जिल्हा बँकेच्या शिरगाव शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 02, 2026 10:41 AM
views 24  views

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

देवगड : जिल्ह्यातील तरुण, माता-भगिनी आणि व्यावसायिकांनी आर्थिक नियोजन करून दुपटीने मोठे पाऊल टाकण्याचा निर्धार करावा. सिंधुदुर्ग जिल्हा बँक तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तुम्ही फक्त स्वप्न पाहा, नियोजन करा आणि पुढे जाण्याचा दृष्टिकोन ठेवा; तुमच्या यशासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरगाव शाखेच्या स्वमालकीच्या नूतन इमारतीच्या स्थलांतर सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या नव्या शाखा इमारतीचे उद्घाटन ना. नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, बँक संचालक प्रकाश बोडस, संदीप साटम, अॅड. प्रसाद करंदीकर, जि.प. सदस्य देवदत्त कदम, शिरगाव पं.स. सदस्य शीतल तावडे, तळवडे पं.स. सदस्य सलोनी तळवडेकर, शिरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विश्राम उर्फ मंगेश लोके, साळशी वि. सोसा. चेअरमन सत्यवान सावंत, हडपीड वि. सोसा. चेअरमन रामचंद्र राणे, तोरसोल्ले वि. सोसा. चेअरमन अरविंद पवार, महाळुंगे नाद वि. सोसा. चेअरमन सुरेश राणे, तळेबाजार वि. सोसा. चेअरमन सदानंद देसाई, जिल्हा बँकेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई, प्रशासन सरव्यवस्थापक शरद सावंत, झेप सरव्यवस्थापक नितीन सावंत, शिरगाव शाखा व्यवस्थापक बापू शेळके, तालुका विकास अधिकारी संजय घाडी, विकास अधिकारी संजय परब तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी-कर्मचारी, शिरगावचे ग्रामस्थ, ग्राहक व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. नितेश राणे पुढे म्हणाले की, “राणे साहेबांचा नेहमीच आग्रह असतो की बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असला पाहिजे आणि त्यात कुठेही तडजोड होता कामा नये. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि कोकणावर त्यांचे अपार प्रेम आहे. त्या स्वप्नातील बँकेच्या पारदर्शक कारभाराला प्रत्यक्षात चालना देण्याचे काम मनीष दळवी बँकेच्या माध्यमातून करत आहेत. त्यांना सर्वांनी साथ द्यावी.”

यावेळी अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की, “राणे साहेबांनी आम्हाला सातत्याने एकच संदेश दिला आहे—जिल्हा बँकेची प्रगती करताना सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. बँकेची प्रगती जितकी वाढेल, तितकाच त्या प्रगतीचा लाभ जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. याच दृष्टीने बँक काम करत आहे. बँकेने केवळ व्यवसायात वाढ केली नाही, तर नफ्यातही मोठी वाढ साधली आहे आणि बँक आज सक्षमपणे उभी आहे.”

ते पुढे म्हणाले की, “शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि महिला या सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून बँकेची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक कटिबद्ध आहे.”

दरम्यान, शिरगाव शाखेच्या नव्या इमारतीमुळे ग्राहकांना अधिक सुसज्ज, आधुनिक आणि सोयीस्कर सेवा मिळणार असून या स्थलांतर सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.