
सावंतवाडी : बालपणीचे मित्र-मैत्रिणी हे भन्नाट असतात. पुन्हा एकदा हसण्या बागडण्यासाठी शाळेच्या त्याच जिवनाचा आनंद लुटण्यासाठी हे बालमित्र मोठेपणी एकत्र आले. मळगांव इंग्लिश स्कूलच्या १९८८-८९ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर याला निमित्त ठरले.
शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीर मळगांव हायस्कूलच्या १९८८-८९ मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. मळगांव रेडकरवाडी येथील 'नरेंद्र सृष्टी' या ॲग्रो टुरिझम रिसॉर्टवर या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. राष्ट्रगीत त्यानंतर महाराष्ट्र गीत गायनानंतर शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारे हजेरी सुद्धा घेण्यात आली. यावेळी हजर .यस सर.. अशा शब्दांत प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाचा आनंद लुटला.
त्यानंतर ३६ वर्षातनंतर पुन्हा एकदा एकत्र आलेल्या काही नव्या मित्र मैत्रिणींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. या स्नेहमेळाव्यात जणू जून्या सवंग ज्यांची नव्याने पल्लवीत झालेल्या आठवणींची मैफीलच या रंगली होती.काहीजण तर पहिल्यांदाच भेटत असल्याने चेह-यावरुन होणारा आनंद स्पष्टपणे दिसत होता. हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. पहिल्या सत्रात अनेक मनोरंजनात्मक खेळ तसेच कार्यक्रम घेण्यात आले. यात आज भी हम जवान है या थाटात अनेक जणांनी आपले कौशल्य सादर केले. बालदीत बॉल टाकणे, बॉल टाकून बाटली पाडणे, फुगा उडवून बॉल पाडणे अशा वैयक्तिक खेळांनंतर संगित खूर्चीसारखे खेळही खेळण्यात आले. वर्गमित्र नागेश मळगांवकर यांच्या कुटुंबियांनी स्वहस्ते बनविलेल्या लज्जतदार भोजनानंतर गाण्याच्या भेंड्या, संगित, गायन, वादन यासारखे कार्यक्रम झाले. काही मित्रांनी काजू गरांचा आस्वाद घेत कॅरम खेळण्याचा आनंदही लुटला. शेवटच्या सत्रात मित्र मैत्रिणींनी नृत्याविष्कार सादर केले. यात प्रदीप सोनुर्लेकर, प्रताप राऊळ, प्रभाकर खडपकर, रामा कोळेकर तसेच मूलीं मधून दर्शना खानोलकर, प्रतिभा राणे, मंदा तळकटकर, पौर्णिमा नेरुरकर यांनी वैयक्तिक व सांघिक नृत्याविष्कार सादर केले.
सरते शेवटी आभार प्रदर्शनासोबतच बॅच मधील वर्षभरात आपापल्या क्षेत्रात पुरस्कार प्राप्त केलेल्या तसेच नावलौकिक केलेल्या मित्रांचा सन्मान करण्यात आला. यात कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे गणित शिक्षक लिंगो डांगी यांना आदर्श गणित शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सीआयडी खात्यात विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल पोलीस महासंचालकांकडून पोलीस पथक प्राप्त केलेल्या पोलीस कर्मचारी माधवी सावळ यांना मित्रांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. तसेच स्नेह मेळाव्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर हा मेळावा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांनाही सन्मानित करण्यात आले. आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशी मनोगत व्यक्त करत आपल्या भावना बोलून दाखवल्या. शेवटी झिंगाट नृत्यावर ताल धरत तूफान नृत्य सादर केल्यानंतर सर्वच मित्र मैत्रिणींनी पुढील वर्षी अशाच प्रकारे 'गेट टुगेदर ' च्या निमित्ताने नव्या जागेत एकत्र येण्याचा संकल्प करीत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.