
वेंगुर्ला : तालुक्यात गेल्या २ दिवसात झालेल्या पावसामुळे घरावर झाड पडून तसेच शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झालेल्या कुटुंबांना तसेच वैद्यकीय उपचारासाठी व कॅन्सरने निधन होऊन छत्र हरपलेल्या कुटुंबाला शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या तर्फे व वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत करण्यात आली.
गेले २ दिवस पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या होत्या. या नुकसानग्रस्तांना मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. आरवली येथील बाळकृष्ण करणेकर व मठ येथील देवेंद्र लक्ष्मण गावडे यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागून नुकसान झाले होते. तर आडेली येथील संतोष परुळेकर यांच्या घरावर झाड पडून छताचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना ही मदत करण्यात आली. तसेच मातोंड येथील सतीश विठ्ठल परब या ४५ वर्षाच्या तरुणाचे कॅन्सरने निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले होते. यामुळे याची तात्काळ दखल घेत कै. सतीश परब यांच्या २ लहान मुलांच्या शिक्षणासाठी तसेच कुटुंबासाठी मंत्री केसरकर यांच्यामार्फत आर्थिक मदत करण्यात आली. तर मातोंड गंडाचीराई येथील शेतकरी संतोष हरमलकर यांच्या पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख उमेश येरम, विभागप्रमुख संजय परब, माजी सभापती सुनील मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, जगदीश परब, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, आरवली उपसरपंच किरण पालयेकर, मातोंड ग्रामस्थ दिलीप परब आदी उपस्थित होते.