मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथील अतिथी अधिव्याख्यात्यांना पुन्हा सेवेमध्ये सामावून घ्या : वैभव नाईक

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 25, 2024 14:12 PM
views 166  views

सिंधुदुर्गनगरी : मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे तासिका तत्वावर कार्यरत असणारे अतिथी अधिव्याख्यातांना २६ जूलै २०२४ रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश  तंत्रशिक्षण संचालनालयाकडून काढण्यात आले. या आदेशामुळे गेली कित्येक वर्ष अध्यापनाचे काम करणाऱ्या अधिव्याख्यात्यांवर अन्याय करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याबाबत आज आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे  संचालक डॉ. विनोद मोहितकर यांची भेट घेऊन अधिव्याख्यात्यांना सेवेमध्ये सामावून घेण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.त्यावर डॉ. विनोद मोहितकर यांनी थोड्या दिवसात अधिव्याख्यात्यांना सेवेमध्ये सामावून घेण्याचे मान्य केले आहे. 

आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, शासकीय तंत्रनिकेतन, मालवण जि. सिंधुदुर्ग येथे तासिका तत्वावर कार्यरत असणारे अतिथी अधिव्याख्याता गेली काही वर्ष विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत आहेत. या अधिव्याख्यातांना २६ जूलै, २०२४ रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाकडून  काढण्यात आले. या आदेशामुळे गेली कित्येक वर्ष अध्यापनाचे काम करणाऱ्या अधिव्याख्यात्यांवर अन्याय करण्यात आला आहे. तसेच या अधिव्याख्यात्यांचे गेले वर्षभराचे मानधन देखील अदा करण्यात आले नाही. तरी या सर्व अधिव्याख्यात्यांना पुन्हा तासिका तत्वावर अधिव्याख्याते म्हणून सेवेमध्ये सामावून घेवून त्यांचे गेले वर्षभराचे थकीत मानधन तात्काळ अदा करण्याचे आदेश  देण्यात यावेत अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे. युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी याबाबत शासकीय तंत्रनिकेतन मध्ये धडक देत शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत प्राचार्य आणि प्राध्यापकांना  जाब विचारून आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच आमदार वैभव नाईक यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली होती.