
बांदा : देशभरातील शेतकऱ्यांना आधार कार्डप्रमाणेच स्वतंत्र नोंदणी क्रमांक असलेले डिजिटल ओळखपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र (युनिक आयडी कार्ड) देण्यात येणार आहे. याकरिता अधिकृत नोंदणी केल्यानंतर त्यास आधारकार्ड प्रमाणे स्वतंत्र क्रमांक मिळणार आहे.
शेतकरी डिजिटल आयडी हे एक १२ अंकांचे एक खास ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. ही आयडी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल आयडी कार्ड म्हणून वापरता येईल. शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने पोहचवण्यासाठी हे डिजिटल आयडी उपयोगी पडेल. लाभाची रक्कम थेट शेतकर्यांच्या खात्यात टाकता येईल. शेतकरी योजना, अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे आयडी कार्ड महत्त्वाचे ठरेल.
यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
१) आधारकार्ड
२) आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल (OTP करीता)
३) ७/१२ किंवा ८ अ उतारा
दरम्यान, निगुडे गावातही ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी ओळखपत्रासाठी दिनांक ४ फेब्रुवारीला यासाठी विशेष कॅम्पचं आयोजन केलं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणून नोंदणी करावी असं आवाहन निगुडे तलाठी प्रणिता गवाणकर तसेच ग्रामसेवक अक्षता गोसावी यांनी केलं आहे.