‘विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षणात 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 14, 2025 19:46 PM
views 61  views

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्या 'विकसित महाराष्ट्र 2047' या दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी देखील https://wa.link/o93s9m या उपलब्ध करुन देण्यात लिंकवर अथवा दिलेल्या क्युआर कोडवर 17 जुलै, 2025 पर्यंत आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये आपले योगदान द्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

राज्य शासनाने 100 दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक 6 मे, 2025 ते दिनांक 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @2047’करिता 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे.‘विकसित महाराष्ट्र 2047 चे  'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र @2047, मध्यमकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र @75 व अल्पकालीन उद्दिष्टे @2029 ठरविण्यात आली आहेत. ‘विकसित महाराष्ट्र -2047’ च्या 'व्हिजन डॉक्युमेंट' चा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय 16 गट स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगरविकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास/ मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील.

राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. ‘विकसित महाराष्ट्र- 2047’च्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण दि. 18 जून, 2025 ते 17 जुलै, 2025 या कालावधीत घेण्यात येत आहे.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी वरील लिंकवर अथवा राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यूआर कोड वरुन व्हॉटस्अप चॅटबॉटद्वारे आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये आपले योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येत नाही. असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.