बारसू रिफायनरी १०० टक्के होणार

Edited by: मनोज पवार
Published on: September 16, 2024 09:54 AM
views 175  views

चिपळूण : चिपळूण शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार, अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी आज येथे दिली. महापूर, रस्ते दुरुस्ती आणि वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राणे म्हणाले, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून गणेश भक्तांना प्रवास करावा लागला. खड्ड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. चिपळूणमध्ये होत असलेल्या उड्डाणपुलाची लांबी वाढवण्यात यावी अशी नागरिकांची मागणी असेल तर त्याचा पाठपुरावा करेन. मी खासदार होऊन केवळ चार महिने झाले आहेत. बराचसा वेळ पावसाळ्यात गेला. मात्र अनंत चतुर्दशीनंतर मी सक्रिय होणार आहे. चिपळूणमधील नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. त्यासाठी निधी कमी पडत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मी नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आवश्यक त्या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देईन. विकासाला प्राधान्य देताना चांगले रस्ते हवेत. ते होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वनौषधी प्रकल्प व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राची समिती यासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी येणार आहे.

बारसू रिफायनरी १०० टक्के होणार !

खेर्डी एमआयडीसीमध्ये इंजीनिअरिंग कारखाने येणार असतील तर त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही करू. केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना सांगून उद्योजकांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. बारसू रिफायनरी प्रकल्प शंभर टक्के होणार. तो होण्यासाठी स्वतः लक्ष घेणार आहे. हा प्रकल्प कोणी अडवू शकत नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.