
देवगड : तांबळडेग येथील समुद्र किनारपट्टीला समुद्राच्या जोरदार लाटांचा तडाखा बसला. धुप झाल्याने उत्तरवाडा येथील अर्धा रस्ता या लाटांमध्ये वाहून गेला आहे. किनारपट्टीलगत असलेली वडाची झाडेही पाण्याच्या प्रवाहाबराेबर काेसळून पडली. किनारपट्टी लगतच्या भागात पाण्याचा प्रवाह सरकू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तांबळडेग समुद्रकिनारपट्टीची सध्या माेठ्या प्रमाणात धूप हाेत असल्याने किनारपट्टीलगत असलेल्या कुटूंबे भीतीच्या छायेखाली आहेत. उत्तरवाडा येथे रमेश सनये यांच्या घरालगत असलेल्या किनारपट्टीची धूप हाेवून किनारपट्टीलगत अर्धा रस्ता वाहून गेला आहे. किनारपट्टीलगत रमेश सनये यांच्या जागेत साई मंदीर आहे.या मंदीरापर्यंत पाणी पाेहचल्याने भविष्यात वस्तीपर्यंत येण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त हाेत आहे. किनारपट्टीलगत असलेल्या झाडांनाही हाेत असलेल्य धुपेचा मोठा फटका बसत आहे.समुद्रकिनारपट्टी भागात धुपप्रतिंबंधक कायस्वरूपी बंधारा तात्काळ बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून हाेत आहे.
उधाणावेळी लाटांचा तडाखा बसत असून तीन वर्षापुर्वी तांबळडेग स्मशानभुमीही वाहून गेली हाेती तर 12 लाख रूपये खर्चुन बांधलेला मासळी सुकविण्याचा ओटा उधाणावेळी आलेल्या लाटांच्या तडाख्याने वाहून गेला हाेता. समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने तांबळडेग किनारपट्टीची हाेत असलेली धुप व वस्तीच्या दिशेने पुढे सरसावत असलेला समुद्र यामुळे तांबळडेग गाव भीतीच्या छायेखाली असून कायमस्वरूपी पक्का दगडी धुपप्रतिंधक बंधारा बांधून मिळावा अशी मागणी ग्रामस्थांचीआहे.