
चित्ररथ, भजन दिंडी खास आकर्षण
रेडी : कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या रेडी गावच्या ग्रामदैवत स्वयंभू श्री देवी माऊलीचा अखंड हरिनाम सप्ताह यंदा गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ ते गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. या सप्तोत्सवासाठी रेडी तसेच पंचक्रोशीतील भाविकांसह कोकण, मुंबई, गोवा आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नागपंचमीच्या चौथ्या दिवशी, म्हणजेच श्रावण शुद्ध अष्टमीला, गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. मंदिरात दिवस-रात्र अखंड टाळ-मृदंगाचा गजर सुरू राहणार असून, सप्ताहाच्या काळात दररोज देवीची आकर्षक आरास करण्यात येणार आहे.
सप्ताहातील पाच दिवस देवी माऊलीची विविध रूपांमध्ये सजावट करून भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. २२ ऑगस्ट रोजी देवीचे सुभद्रा रूप, २३ ऑगस्ट रोजी व्याघ्रेश्वरी रूप, २४ ऑगस्ट रोजी पार्वती रूप, २५ ऑगस्ट रोजी वसुंधरा रूप (नवग्रह दर्शन), तर २६ ऑगस्ट रोजी हिंद्योळ्यावर विराजमान देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसापासून दररोज रात्री विविध वाड्यांमधून चित्ररथ, भजन दिंडी व दिंडी पथकांसह मिरवणुका श्री देवी माऊली मंदिरात दाखल होणार आहेत. पौराणिक विषयांवर आधारित भव्य आणि आकर्षक चित्ररथ हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. वारकरी वेशभूषेत विठ्ठल नामाचा जयघोष करत सहभागी होणाऱ्या भाविकांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
२२ ऑगस्ट रोजी कनयाळवाडी, तिवरेवाडी व तळेवाडी, २३ ऑगस्ट रोजी नागोळेवाडी, २४ ऑगस्ट रोजी सुकळभाटवाडी, २५ ऑगस्ट रोजी म्हारतळेवाडी, तर २६ ऑगस्ट रोजी हुडावाडी व गावतळेवाडीचे चित्ररथ व दिंडी पथक सहभागी होणार आहेत.
सप्तोत्सवाची सांगता गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. यावेळी स्वयंभू श्री देवी माऊलीची पालखी समुद्राकडे नेण्यात येऊन समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा पार पाडली जाणार आहे. त्यानंतर पालखी मंदिरात परतल्यानंतर महाआरती होईल व भाविकांना पंचखाद्याचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
रेडी गावात सात दिवस चालणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, श्री देवी माऊलीचा हा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










