रेड रिव्हॉल्यूशन ; रक्तदात्यांकडून जीवनदान !

सिंधुदुर्गसह, गोव्यात युवकांच रक्तदान !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 11, 2024 14:09 PM
views 271  views

सावंतवाडी : रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांसाठी हक्काची 'ब्लड बँक' ठरणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेने आपली ओळख कायम ठेवली आहे. गेली अनेक वर्ष युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून युवाई रक्तदान चळवळीत कार्यरत आहे. नुकतीच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह, जिल्हा रुग्णालय ओरोस व गोवा मणीपाल रूग्णालय येथे उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या मदतीला युवा रक्तदाता संघटना धावून गेली. रक्तदान करत दात्यांनी रूग्णांना जीवनदान दिलं आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णाला 'बी पॉझिटिव्ह' या रक्त गटाची आवश्यकता होती. यावेळी भार्गव धारणकर यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तदान करत रूग्णाला जीवनदान दिले‌‌. तसेच जिल्हा रुग्णालय ओरोस येथे शुभम गावडे यांनी एबी पॉझिटिव्ह या रक्तगटाचे रक्त दिले. गोवा- मणीपाल येथे उपचार घेणाऱ्या रूग्णाला 'ए पॉझिटिव्ह' रक्ताची आवश्यकता होती. यावेळी सावंतवाडीतील आशिष नाईक, मंदार सावंत, भास्कर आमुणेकर, विनायक गांवस यांनी रक्तदान केले. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. तातडीने रक्तपुरवठा केल्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व रक्तदात्यांचे नातेवाईक व रक्तपेढीकडून आभार मानण्यात आले. 

रक्तापलिकडचं नात जपण्याचे काम युवा रक्तदाता संघटना गेली अनेक वर्षे करत आहे. गोवा बांबोळी, मणीपाल, जिल्हा रुग्णालय ओरोस या ठिकाणी देखील संघटनेचे सदस्य रक्तदाते  सामाजिक भान ठेवून अपघातग्रस्त तसेच तातडीच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनून रक्तदान करत आहेत‌. यापुढेही रक्तदानासाठी संघटना अशाच पद्धतीने कार्यरत राहील. या लाल क्रांतीमध्ये अनेकांनी सामील व्हावं आणि रूग्णांचे जीव वाचवावे, रक्तदान करावे असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.