महायुतीत बंडखोरी, विशाल परबांची 'अपक्ष' उमेदवारी

रॅलीत 'भाजप'च्या घोषणा ; पक्षाचा छुपा आशीर्वाद ?
Edited by: विनायक गांवस
Published on: October 28, 2024 09:23 AM
views 290  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीत देखील बंडखोरी झाली आहे. भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत भाजपच्या घोषणा दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशाल परब ही ताकद फक्त सावंतवाडीत नाही. संपूर्ण कोकणात माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. आजची गर्दी ही प्रेमापोटी झालेली असून मतपेटी विशालमय झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानंतर विशाल परब शेकडो समर्थकांसह प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांच्यासह पत्नी सौ. वेदीका परब तसेच ज्येष्ठ नागरिक प्रमिला पंडित, शुभांगी राणे, रविंद्र जाधव उपस्थित होते. 

यावेळी विशाल परब म्हणाले, ही बंडखोरी नाही, हा जनतेचा उठाव आहे‌. मतदारसंघात बदल हवा आहे. विशाल परबला आमदारकी स्वतःसाठी नको आहे. माझं जीवन येथील जनतेसाठी अर्पीत करत आहे. माझ्यावर होणाऱ्या आरोपांना जनता निकालातून उत्तर देईल. माझ्या जीवाला काही झालं तर आयुष्यात चांगलं काम करून जाईन. मी कोणाच वाईट केलेलं नाही. जे माझ्यावर बोलतात त्यांना चांगली बुद्धी परमेश्वराने देवो असं ते म्हणाले. तसेच मतपेटी विशालमय झाली असुन नव्या चेहऱ्याला लोक संधी देतील. महायुतीच्या नेत्यांचा मी मानसन्मान करतो. टिकाटीपणी करणार नाही. राजकारण 23 तारीख नंतर संपलेल असेल अशी प्रतिक्रिया दिली.

भाजपचा छुपा पाठींबा ?

दरम्यान, भाजपचा छुपा आशीर्वाद आहे का ? असं विचारलं असता श्री.‌परब म्हणाले, मी एक कार्यकर्ता आहे. पक्षाला मानणारा आहे. सर्वसामान्य जनतेत विशाल परब हे नाव आहे. शिवरामराजे भोसले, शिवराम दळवी, दीपक केसरकर चांगले आमदार इथे ह़ोऊन गेले. आता नवीन पिढी पुढे येण आवश्यक आहे. भविष्यात मतदारसंघाचा विकास करणं हे माझं ध्येय आहे. विशाल परब ही ताकद फक्त सावंतवाडीत ताकद नाही. संपूर्ण कोकणात माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. आजची गर्दी ही प्रेमापोटी झालेली आहे असं मत व्यक्त केले. मोती तलाव येथून प्रांताधिकारी कार्यालयाकडे आलेल्या रॅलीत 'भारतीय जनता पार्टीचा विजय असो' अशा घोषणा दिल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या.