
सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीत तळवडे मतदार संघातुन स्थानिक उमेदवार डावलून बाहेरील उमेदवार लादल्याने प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या प्रवृत्तीला विरोध म्हणून निरवडे गावचे माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहे.
पंचायत समिती माजी सभापती प्रियांका गावडेंचे ते पती असून प्रमोद गावडेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यात शिवसेना देखील याठिकाणी इच्छुक होती. मात्र, भाजपला ही जागा गेल्यानं शिवसैनिक कोणती भूमिका घेणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे. आज वेळ कमी आहे, पुढे तुम्हाला प्रत्यक्ष भेटून पुढील निर्णय घेऊ अशी भावना श्री. गावडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या संदीप गावडेंसमोर आव्हान उभं राहणार आहे.
यामुळे भाजपात बंडखोरी निर्माण झाली असून हे बंड शांत करण्यासाठी नेत्यांना लक्ष घालावं लागणार आहे. मात्र, स्थानिकांना डावलल्याने प्रमोद गावडेंनी उगारलेली तलवार ते म्यान करणार का ? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.










