
वैभववाडी : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगले वाचन आवश्यक आहे.वाचन हे यशाचा उत्तम मार्ग आहे असे प्रतिपादन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याचा वैभववाडीत येथील अर्जुन रावराणे विद्यालयात शुभारंभ झाला.याप्रसंगी श्री रावराणे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस बी शिंदे,कोकणसादचे प्रतिनिधी श्रीधर साळुंखे,शिक्षक व्ही एस मरळकर,यु डी मुजावर,पी ए कांबळे,पी ए पाटील, योगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
रावराणे म्हणाले,वाचन ही काळाची गरज आहे.सर्व क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीचा मार्ग या वाचनातूनच मिळाला आहे.त्यामुळे शासनाच्या या वाचन महोत्सवात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.या वाचन महोत्सवातील आज छोटं वाटणार बक्षीस भविष्यात तुम्हाला कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देऊ शकते असा विश्वास श्री.रावराणे यांनी व्यक्त केला.श्री.शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आजच्या युगात वाचन संस्कृती लोप पावली जात आहे.प्रत्येक जण वाचनापासून दुरावला आहे.त्यांना पुन्हा वाचनाची आवड लागण्यासाठी शासनाचा "वाचन महोत्सव" हा स्तुत्य उपक्रम आहे.प्रत्येकाने यात सहभागी झाले पाहिजे असं आवाहन केलं.कार्यक्रमाचे प्रस्तावित श्रीधर साळुंखे तर आभार व्ही एस मरळकर यांनी मानले.