वाचन, मनन, चिंतनावर भर देवून ध्येय गाठा! ; SP सौरभ अग्रवाल यांनी दिल्या मौलिक 'TIPS'

‘प्रेरणा’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 18, 2023 17:49 PM
views 160  views

सिंधुदुर्गनगरी : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रथम आपले ध्येय निश्चित करा, वाचन, मनन आणि चिंतनावर भर देवून ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, आयुष्यामध्ये प्रत्येक यश आनंद देते तर प्रत्येक नवीन अपयश शिकवण देवून जाते, स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गाची निवड करा, अपयश आल्यास खचून जावू नका, नव्या जोमाने व आणि जोशाने स्पर्धा परीक्षांची तयारी करा, स्पर्धा परीक्षामध्ये प्रत्येकजण यशस्वी होईलच असे नाही, त्यासाठी 'प्लॅन बी' तयार ठेवा, असा मौलीक सल्ला पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिला.

‘प्रेरणा’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी 'परीक्षांची तोंड ओळख' व 'मुख्य परीक्षा' या विषयावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, प्रशिक्षणार्थी आयएएस करिष्मा नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत उपस्थित होत्या.

यावेळी अग्रवाल म्हणाले, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी आपल्या स्वत:च्या क्षमता ओळखून आपल्या आवडीनुसार विषयांची निवड करावी. परीक्षा यंत्रणांद्वारे वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची सखोल माहिती आत्मसात करावी. अभ्यास करताना अचूकपणे अभ्यास करण्यावर भर द्यावा. त्यासाठी अधिकचे कष्ट घ्यावेत. समूह चर्चावर भर द्यावा. अभ्यास करताना काय शिकावे? काय शिकू नये? याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी महत्त्वाच्या विषयांची यादी तयार करावी. विषयनिहाय अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे. बदलत्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यात यावा.

 श्री. अग्रवाल पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षेचे तीन टप्पे असून यामध्ये 'पूर्व परीक्षा', 'मुख्य परीक्षा' आणि 'व्यक्तिमत्व विकास' याचा समावेश होतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तीन तासाच्या कालावधीमध्ये २५ प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात. यामध्ये एका प्रश्नाला साधारणपणे ७ मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यानुसार परिक्षार्थींनी पेपर लिहीताना वेळेचे भान ठेवून नियोजन केले पाहिजे. दुसऱ्याकडून माहिती मिळावी ही अपेक्षा आयुष्यामध्ये कधीही ठेवू नये. स्वत: त्यासाठी सक्षम होणे, हा त्यावरचा एकमेव उपाय आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न व अडचणी याबाबत विचारणा केली त्यास श्री. अग्रवाल यांनी समर्पक उत्तरे देवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.

या कार्यशाळेत ‘परीक्षांची तोंड ओळख व परीक्षेचे धोरण’ या विषयावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, ‘वनसेवा’  या विषयावर उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, ‘पूर्व परीक्षा तयारी’ या विषयावर प्रशिक्षणार्थी आयएएस करिष्मा नायर, ‘मुख्य परीक्षा धोरण’ या विषयावर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,    ‘एमपीएससी व प्रश्नोत्तरांचे सत्र’ याबाबत मालवण  तहसीलदार श्रीधर पाटील व परीक्षावधीन उपजिल्हाधिकारी प्रसन्नजीत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान ‘प्रेरणा’ अंतर्गत एक दिवसीय मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळेमध्ये सुमारे २५० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन आपला सहभाग घेतला.