
सावंतवाडी : 'सफाई कर्मचारी हे काही मशीन नाहीत. तेही समाजाचाच भाग आहेत. त्यांची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर एक दिवस त्यांच्या जागी उभे राहून त्यांच्या कामाचा अनुभव घ्या, शहरातील जनतेला वेठीस धरण्याचा हेतू नाही. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि विलास जाधव यांनी नुकत्याच केलेल्या तीव्र आंदोलनानंतर काही नेत्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे, अशी टीका 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे रवी जाधव यांनी करत टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शहरातील गोरगरीब सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी बुडवल्याचा मुद्दा गंभीर प्रश्न असून गेली तीन वर्षे लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान' उभे राहिले आहे. अस श्री जाधव म्हणाले. 'यापुढे जनता कोणाला स्वीकारेल किंवा नाकारेल हे नियती ठरवेल. परंतु, कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे माजी नगराध्यक्ष संजू परब एवढे दिवस कुठे होते ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत श्री. साळगावकर यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. या, कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
येत्या पंधरा दिवसांत सफाई कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'ने दिला आहे. ज्यांनी या कर्मचाऱ्यांच्या घामाचा पैसा खाल्ला आहे, त्यांना योग्य शासन झाल्याशिवाय माघार नाही, असेही त्यांनी सांगितले.