गोट्या सावंत यांनी आप्पा तावडे यांना मारहाण केल्याचे राऊत यांनी सिद्ध करावे

संजना सावंत यांच खुलं आव्हान
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 30, 2023 17:39 PM
views 683  views

कणकवली : खासदार विनायक राऊत यांनी आप्पा तावडे यांना गोट्या सावंत यांनी मारहाण केल्याचा जो आरोप केला आहे, तो पुराव्यानिशी सिद्ध करावा. मारहाण करतानाचा जर व्हिडिओ दाखवला किंवा पुरावा दिला तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ. परंतु जर सिद्ध करता आले नाही तर त्यांनी तरी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आव्हान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संजना सावंत यांनी दिले आहे.


खासदार विनायक राऊत यांनी कनेडी येथे केलेल्या टिकेचा संजना सावंत यांनी खरपूस शब्द समाचार घेतला आहे. एटीएम घोटाळ्यातील प्रमुख आरोपीची बाजू घेऊन खासदार विनायक राऊत  आमच्यावर टीका करण्यासाठी या ठिकाणी आले. तेच विनायक राऊत हे  एटीएम घोटाळ्याच्या वेळी आले असते तर यांना खरोखरच जनतेची काळजी आहे असे म्हणता आले असते. खासदार म्हणून दुटप्पी भूमिका त्यांना शोभनीय नाही. या उलट गोट्या सावंत आपल्या कार्यालयात बसलेले असताना मुजोर झालेले माजोरी शिवसैनिक हे 30 ते 40 जणांच्या जमावाने भाजपच्या कार्यालयात घुसले व गोट्या सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या घटनेचा मी निषेध करते. असे देखील सावंत यांनी सांगितले.


त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दाखल उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया उमटल्या. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक एखाद्या सराईत गुंडाप्रमाणे हातात दांडा घेऊन फिरत होते. याचे व्हिडिओ असून देखील ही गोष्ट विनायक राऊत यांच्या दृष्टीस पडली नाही का? उलट कोणताही संबंध नसताना या ठिकाणी येऊन वैभव नाईक यांनी खऱ्या अर्थाने वातावरण बिघडवले आहे. यात सर्व प्रकरणात काहींच्या दोन तोंडात मारलं गेलं. कारण काहींचे पाय जमिनीवर येण्याची गरज होती असाही टोला सौ सावंत यांनी लगावला. 


खासदार विनायक राउत हे तीन ते चार महिन्यांनी कनेडीला आले मात्र गोट्या सावंत यांचा जनता दरबार हा रोज भरतो. जनतेच्या समस्या त्या नियमित कार्यालयात बसून सोडवीत असतात. सतीश सावंत यांचं गेल्या काही वर्षात असलेलं अस्तित्व हे संजना सावंत व गोट्या सावंत यांच्यामुळे संपत चाललं व या धास्तीतूनच हा सारा प्रकार शिवसेनेने घडवून आणला असा आरोप देखील सावंत यांनी केला.


कागदी वाघ बनलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जर हिम्मत असती तर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर उभी राहून मी स्वतः त्यांना बाहेर येण्याची आव्हान दिले. आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे कार्यालयात लपून बसून होते. मात्र त्यांनी बाहेर येण्याची तेव्हा हिम्मत का दाखवली नाही? घोटाळे व फ्रॉड करणारेच लोक खासदार राऊत यांच्यासोबत होते. आम्हाला घोटाळे व गैर व्यवहार करण्याची गरज नाही. जिल्हा परिषद मधील आमचा कारभार हा पारदर्शक असा राहिला आहे. याउलट आमदार वैभव नाईक यांनी देवबाग मध्ये सर्वे नंबर 199 मध्ये घर नंबर नसताना सुद्ध ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या नावावर निधी लाटलेला आहे. म्हणजेच शासकीय निधी लाटणे घोटाळे करणे हे आमदार वैभव नाईक यांनी केलेले खासदार विनायक राऊत यांना चालते का? असा सवाल संजना सावंत यांनी केला.


गोट्या सावंत यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कनेडी बाजारपेठेमध्ये माघी गणेश जयंती साजरी केली जाते. उत्सवाच्या निमित्ताने अनेकदा सतीश सावंत यांनी गोट्या सावंत यांना काही ना काही कारण समोर करत सत्तेचा गैरवापर करून अडकवण्याचा प्रयत्न केला. असा आरोप देखील सौ सावंत यांनी केला. गोट्या सावंत कार्यालयात एकटे बसलेले असताना शिवसेनेचे 40 ते 50 जण कार्यालयात घुसले. मात्र ज्यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह सुमारे 100 जण शिवसेनेच्या कार्यालयात हजर होते. त्यावेळी मी कार्यालयाबाहेर थांबून आव्हान दिलं त्या प्रसंगी शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्यांमध्ये बाहेर येण्याची हिंमत का झाली नाही? असा सवाल सावंत यांनी केला.


अपहार व घोटाळे करणारेच खासदार विनायक राऊत यांच्यासोबत फिरत असताना दुसऱ्यांवर खासदार विनायक राऊत यांनी आरोप करण्यापेक्षा अगोदर त्यांच्यासोबत असलेल्या घोटाळे बहाद्दरांना हे सल्ले द्यावेत असा टोला संजना सावंत यांनी लगावला. तसेच खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदर रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. कारण गोट्या सावंत यांचा मोबाईल चोरून नेण्याची वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. त्यामुळे जर राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना रोजगार दिला तर अशी चोरी करण्याची वेळ राऊत यांच्या कार्यकर्त्यांवर येणार नाही, असा देखील टोला सावंत यांनी लगावला.