
चिपळूण : शहरातील ओमेगा वाईन मार्टचे संचालक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मद्य व्यवसाय क्षेत्रातील एक मोठं नाव असणारे नितीन उर्फ भाई रेडीज यांचे सोमवारी (१८ ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चिपळूणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नितीन रेडीज यांना सर्वत्र भाई रेडीज या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अभ्यासू वृत्ती, व्यावसायिक दृष्टी आणि समाजातील मानाचे स्थान या गुणांचा संगम होता. मद्य व्यवसायात त्यांनी ओमेगा वाईन मार्ट या ब्रँडद्वारे मोठं स्थान निर्माण केलं.
ते चिपळूणचे माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज व रोटरीचे माजी अध्यक्ष वैभव रेडीज यांचे ज्येष्ठ बंधू होत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार सुरू असतानाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनामुळे रेडीज कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. आज (सोमवार) सायंकाळी ७ वाजता त्यांची अंत्ययात्रा ओझरवाडी येथील राहत्या घरातून निघेल. त्यानंतर रामतीर्थ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.