
गुहागर : महिलांच्या कार्यस्थळी (कामाच्या ठिकाणी) सुरक्षिततेबाबत जनजागृती व्हावी तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या वतीने दिनांक २५ जुलै २०२५ रोजी महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे महिलांवरील लैंगिक अत्याचार व कायदे या विषयावर कायद्याविषयक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये श्री. पी. व्ही. कपाडिया (दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, गुहागर तसेच अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, गुहागर) यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा, २०१३ (POSH कायदा) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ (POCSO कायदा) यावर सविस्तर आणि समजून घेता येईल अशा पद्धतीने मार्गदर्शन केले.
न्यायमूर्ती कपाडिया यांनी पॉश कायद्याच्या माध्यमातून महिलांना कामाच्या ठिकाणी मिळणारे कायदेशीर संरक्षण, तक्रारीची प्रक्रिया, अंतर्गत तक्रार समित्यांचे कार्य आणि संस्थेची जबाबदारी याबाबत अत्यंत स्पष्ट भाषेत माहिती दिली. त्यांनी वास्तविक उदाहरणांच्या साहाय्याने कायद्याच्या तरतुदी, त्याचे गुन्हेगारी स्वरूप आणि समाजातील त्याचे महत्त्व समजावले. पॉक्सो कायद्यासंदर्भात बोलताना, त्यांनी बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी कायद्याने दिलेले विविध उपाय स्पष्ट केले. मुलींबरोबरच मुलांचाही समावेश या कायद्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. शिक्षण संस्था, पालक आणि समाजाने एकत्र येऊन या कायद्यांची योग्य अंमलबजावणी कशी करावी, यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमात ॲड. (वकील) सौ. पी. पी. कपाडिया आणि ॲड. सौ. पी. एस. मुरकर यांनीही आपले मार्गदर्शन दिले. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अविनाश पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या (वूमन डेव्हलपमेंट सेल) संयोजिका सौ. प्रीती साठे-भोळे यांनी नेटकेपणाने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.