दारुबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

दोडामार्ग पोलिसांची कारवाई
Edited by: लवू परब
Published on: July 28, 2025 19:55 PM
views 72  views

दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारुबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दारू व जुगार साहित्य असा मिळून एकूण ५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारू बाळगल्याप्रकरणी काशीराम न्हानु सुतार (५२), रा. घोटगेवाडी व सुदन नारायण बोंद्रे (४६), रा. साटेली भेडशी खालचा बाजार अशी संशयितांची नावे आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

कोनाळकट्टा ते शिरंगे पुनर्वसन रोड वरील खानयाळे धनगरवाडी तिठा येथे संशयित काशीराम सुतार यांच्याकडून हनी ग्रेड ब्रॅंडी या लेबलची गोवा बनावटीची १८० मिली मापाच्या कंपनी सिलबंद १०० रुपये किमतीच्या ४७ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) नुसार कारवाई केली. साटेली भेडशी येथील धान्य गोदामाजवळ मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी संशयित सुदन बोंद्रे याच्याकडून एक कार्बन पेपरसह जुगार आकडे लिहिलेला कागद, एक वापरलेले निळ्या शाईचे बॉलपेन व १२२० रुपये रोख रक्कम हस्तगत केली. संशयित आरोपी सूदन बोंद्रे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका जुगाराचे आकडेवारी लोकांकडून पैसे स्वीकारून मटका जुगारी खेळ खेळवीत असताना मिळून आला. त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.