करुळ घाटात दरड कोसळली

तासभर वाहतूक ठप्प
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 28, 2025 19:11 PM
views 29  views

वैभववाडी : करूळ घाटात रविवारी (ता. २७ ) रात्री दरड कोसळली. त्यामुळे तळेरे - कोल्हापुर महामार्गावरील वाहतुक तासभर ठप्प झाली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविल्यानतंर एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली.आज सायंकाळी (ता. २८) पुर्णतः दरड हटवून मार्ग पुर्ववत करण्यात आला.

तालुक्यात आठवडा भर पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. परंतु सायकांळी उशिरा करूळ घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला. करूळ, भुईबावडा घाट परिसरात पावसाचा जोर अधिक होता. या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे तळेरे - कोल्हापुर महामार्गावरील करूळ घाटात रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. मोठ मोठे दगड रस्त्यावर आल्याने बहुतांशी रस्ता त्याने व्यापला होता. त्यामुळे या महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली. शेकडो वाहने करूळ घाटात अडकली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठा रांगा लागल्या होत्या.

पोलीसांना ही माहीती मिळाल्यानतंर भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे वाहतुक वळविली. महामार्ग प्रधिकरणच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने मार्गावरील काही दगड बाजूला करण्यात आले. त्यानतंर एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली. दरडीचा उर्वरित भाग हटविण्याचे काम आज सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आले. ब्रेकरच्या साह्याने दगड फोडून ते हटविण्यात आले. सुमारे पाच तास हे काम सुरू होते. आज सायकांळी साडेचार वाजता संपूर्ण दरड हटवून या मार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. तब्बल वीस तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.



फोटो ओळी:करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.


फोटो ओळी: