
रत्नागिरी : जिजाऊच्या मोफत प्रशिक्षण केंद्रातून अनेक शासकीय अधिकारी घडलेत. पालघर, ठाणे अन् रत्नागिरीत आज श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सेवा देत आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात संस्थेच कार्यरत असून या कोकणातून आयएएस, आयपीएस अधिकारी घडवण्याचं माझं स्वप्न आहे. आरोग्यासाठी लोकांना दागिने गहाण ठेवण्याची, शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ गोरगरीबांवर येऊ नये, हा माझा उद्देश आहे, असे उद्गार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी काढले.
येथील श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी श्री. सांबरे म्हणाले, समाजाचं देणं लागतो या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. आई-वडीलांनी दिलेले संस्कार घेऊन आम्ही कार्यरत आहोत. दिनदुबळ्याच्या दुःखासाठी आम्ही कार्य करत आहोत. कोकणातील पाचही जिल्ह्यात आम्ही कार्यरत आहोत. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भगवान सांबरे, भावना सांबरे, उद्योजक रवींद्र सामंत, इंद्रजीत देशमुख, सौ. उमा प्रभू, हेमंत भागवत, कोकणसादचे संपादक-संचालक संजय ढवळीकर, संपादक सागर चव्हाण, राहुल गडपाले, सुशीलकुमार मुळे, राजेंद्र केसरकर, विनोद राऊळ, संतोष राणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.










