LIVE UPDATES

मुंबई-गोवा महामार्गावर जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा !

आज रात्रीपर्यंत टॅंकर पोहचणार : जिल्हा पुरवठा अधिकारी
Edited by: विनायक गांवस
Published on: June 01, 2026 20:54 PM
views 31  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असून  नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पुरवठ्यावर प्रशासनाचे सातत्याने लक्ष आहे, असं जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे वारंवार सांगितलं जात आहे. विक्री प्रतिनिधी आणि डेपो व्यवस्थापकांकडून व्हिडिओ करून आवाहनही न चुकता केल जातंय. मात्र, सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा पहायला मिळाला.  मुख्यत्वे मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या तळेरेपासून सावंतवाडी पर्यंच्या मुख्य पेट्रोल पंपावर ही परिस्थिती पहायला मिळाली. सावंतवाडीतही काही पंपावर सकाळपासून डिझेल नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून पुरेसा साठा आहे, अशी आवाहन नेमकी कशासाठी केली जातात ? असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे. तर सांगली मिरज येथील बेस डेपो बंद असल्यामुळे टॅंकर लोड होऊ शकले नाही. आज रात्रीपर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल, घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले. 

जिल्ह्यातील तळेरे, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, ओसरगाव, कुडाळातील काही, सावंतवाडी आदी बहुतांश पंपावर डिझेलचा तुटवडा असून देवगड, वेंगुर्लेत काही ठिकाणी तुटवडा आहे, तर काही पंपावर डिझेल उपलब्ध आहे. वैभववाडी, दोडामार्ग, मालवण, गोव्याच्या सीमेवरील पत्रादेवी पंपावर मुबलक प्रमाणात डिझेल असून पुरवठा सुरळीत आहे. मात्र, जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील बहुतांश पंपावर डिझेलचा थेंबही मिळत नाही. कुडाळ येथील एका पंपावर थोडाफार साठा शिल्लक असल्याने प्रवाशांना पत्रादेवी गाठणं शक्य होत आहे‌. तसेच मोठा दिलासा मिळत आहे. अन्यथा, डिझेल अभावी गाडीतच दिवस काढण्याची वेळ वाहन धारकांवर आली होती.

यातच, गेले दोन दिवस जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेबाबत नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसून इंधनाचा पुरेसासाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालय देत आहे. जिल्ह्यातील सर्व ६३ पेट्रोल पंपांवर पेट्रोल- डिझेलचा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन केल्याची प्रसिद्धी पत्रक एक दिवस आड न चुकता काढली जात आहेत. मात्र, दुसरीकडे पंपावरची परिस्थिती वेगळीच दिसत आहे.

दरम्यान, याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, याबाबतची आकडेवारी आपल्या कार्यालयात आहे. आता निवासस्थानी असल्यामुळे नेमकी आकडेवारी सांगू शकत नाही. मात्र, उद्या कार्यालयात भेट दिल्यास सविस्तर माहिती देईन. तसेच काल सांगली मिरज येथील बेस डेपो बंद असल्यामुळे काहींचे डिझेल टॅंक लोड होऊ शकले नाहीत, जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. बीपीसीएल, एलपीसीएल, आयवोसीएलचे टँकर आज भरले गेलेत. ते आज रात्री उशीरापर्यंत जिल्ह्यात पोहचणार असून जिल्ह्यातील परिस्थिती पूर्ववत होईल, पुरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी देखील घाबरून जाण्याची गरज नसून उद्यापासून जिल्ह्यात अशी परिस्थिती राहणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे मोठा दिलासा डिझेल वाहन धारक, पर्यटक, मालवाहू चालकांना मिळाला आहे.