झोळंबेत आढळला दुर्मिळ किंग कोब्रा !

वनविभागाचं यशस्वी रेस्क्यु ऑपरेशन !
Edited by: संदीप देसाई
Published on: April 17, 2024 15:03 PM
views 1353  views

दोडामार्ग : जिल्ह्यात जैवविधतेने समृध्द असलेल्या दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा किंग कोब्रा चे अस्तित्व आढळून आले आहे. तब्बल साडे अकरा फुटांच्या हा किंग कोब्रा दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात बुधवारी आढळून आला असून वनविभागाने गोव्यातील 'अॅनिमल रेस्क्यू स्कॉड' च्या मदतीनें यशस्वी रित्या त्याचं रेस्क्यु करून बचाव केला आहे. विशेषतः पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा साप आढळतो आहे हे विशेष. 

'किंग कोब्रा' सापाला 'नागराज' असे म्हटले जाते. मात्र दोडामार्ग तालुक्यात ग्रामीण भागात त्याला 'डोम' किंवा 'काळा साप' म्हणून ओळखला जातो. हा साप जबर विषारी असून तो लांबीने साधारण २० फूटांपेक्षा अधिक वाढतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा त्याचे प्रामुख्याने अस्तित्व आढळतो. पश्चिम घाटामधील 'किंग कोब्रा'च्या अधिवास क्षेत्राची उत्तरेकडील सीमा ही दोडामार्ग तालुका आहे. या तालुक्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच 'किंग कोब्रा'च्या नोंदी आहेत. हा साप मोठा व विषारी असल्याने त्याला पूर्वी मारले जायचे. मात्र आलिकडे झालेली जागृती व  लोक पुढाकार यामुळे आता साफ मारण्याचे प्रकार बऱ्यापैकी बंद झाले आहेत. त्यामुळे दोडामार्गमध्ये आता अनेक सापाना जीवदान दिल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी  झोळंबे गावातील सतीश कामत यांच्या मालकीच्या बागायतीत 'किंग कोब्रा'चे दर्शन झाले होते. येथील एका झाडावर हा 'किंग कोब्रा' बसला होता. कामत यांनी यासंदर्भातील माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांना दिली. त्यानंतर भिसे यांनी वन विभागाला कळवून या सापाचे बचाव कार्य करण्यास सांगितले.

त्यानंतर सावंतवाडी वन विभागाचे वन्यजीव संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पथक दुपारी घटनास्थळी दाखल झाले. झाडावर असलेल्या 'किंग कोब्रा' ११.५ फुटांचा असल्याने त्याला पकडण्यासाठी तज्ज्ञ सर्पमित्रांची गरज होती. म्हणून वन विभागाने गोव्यातील 'अॅनिमल रेस्क्यू स्कॉड' पथकातील सर्पमित्रांना पाचारण केले. पथकाचे प्रमुख अमृत सिंग यांनी काळजीपूर्वक सापाचे रेस्क्यू केले. यानंतर सापाची तपासणी करुन त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडल्याची माहिती संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पथक वनपरिक्षेत्र अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) मदन क्षिरसागर यांनी दिली. दोडामार्ग तालुक्यामध्ये यापूर्वी 'किंग कोब्रा' रेस्क्यूही करण्यात आला होता. आता ही दुसरी वेळ आहे. 'तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा'मध्ये या सापाचा प्रामुख्याने अधिवास आहे. मात्र या सापाच्या बाबतीत नागरिकांत कमालीची भीती आहे. मात्र पुन्हा एकदा दोडामार्ग मध्ये किंग कोब्रा आढळून आल्याने येथील जैवविवीधता आजही समृध्द असल्याचे अधोरेखित झाले आहे. अलीकडेच दोडामार्ग मध्ये पट्टेरी वाघ, ब्लॅक पँथर चेही दर्शन झालं होत.