
दोडामार्ग : झोळंबे येथील बागायतदार फार्म स्टे या कृषी पर्यटन केंद्राच्या परिसरात सापासारखा जीव मागील रविवारी संध्याकाळच्या सुमारास फार्म स्टे चे संचालक ओंकार गावडे आणि गोव्यामधील वन्य जीव अभ्यासक विकास कुलकर्णी यांना आढळून आला.
प्रथमदर्शीनी हा गांडूळ असल्याचा भास झाला. परंतु त्याची हालचाल एखाद्या सर्पाप्रमाणे होती. खात्री करून घेण्यासाठी विकास कुलकर्णी यांनी सरीसृप अभ्यासक वरद गिरी यांना फोन वरून संपर्क साधून माहिती दिली. तसेच छायाचित्रे पाठविली आणि त्यांनी त्याबद्दल अचूक ओळख तसेच माहिती दिली. हा जीव आपल्या नैसर्गिक अधिवासात असल्याने त्याला त्रास न देता आणि हाताळत शक्य तेवढी छायाचित्रे घेण्यात आली. या जीवाला शास्त्रीय भाषेत बॉंबे सिसिलियन आणि मराठीत देव गांडूळ असे म्हणतात. हा उभयचर असून पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी त्याचा अधिवास असतो. त्याला स्पर्श केल्यास शरीर बुळबुळीत लागते. कारण शिकार होऊ नये म्हणून तो आपल्या शरीरावर चिकट बुळबुळीत स्त्राव सोडतो. हा जीव प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळून येतो. डोळे अगदी छोटे टाचणीच्या आकाराचे आणि सहज न दिसणारे असतात, गोलाकार रिंगण (स्केल्स ) असणारे शरीर यावरून त्याची ओळख निश्चिती होते असे वरद गिरी यांनी सांगितले.
या निमित्ताने दोडामार्ग तालुक्यातील पश्चिम घाटालगत असलेल्या गावामधील जैव विविधतेचा अभ्यास करून आढळणारे वन्य जीव आणि इतर जीवांची नोंद करणे आवश्यक आहे असे आंबोली येथील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकार श्री महादेव उर्फ काका भिसे यांनी सांगितले .
झोळंबे ग्रुप ग्राम पंचायत मध्ये जैव विविधता नोंद वहीत या प्राण्याची नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल असे श्री ओंकार गावडे म्हणाले. झोळंबे गाव अगदी पश्चिम घाटालगत असल्याने या परिसरात आढळणाऱ्या जैवविविधतेची नोंद बागायतदार फार्म स्टे मध्ये ही ठेवली जाणार असून भविष्यात सरीसृप अभ्यासकांना त्याचा उपयोग होईल असेही श्री ओंकार गावडे यांनी सांगितले.