कुणकेश्वरात होतोय रापण महोत्सव !

4 - 5 नोव्हेंबरला आयोजन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 18, 2023 13:52 PM
views 849  views

देवगड : देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती(देवगड) श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर कुणकेश्वर – कातवण रापण संघ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅक यांच्या सहकार्यातून रापण महोत्सव 2023 चे आयोजन कुणकेश्वर बीच या ठिकाणी दिनांक ४ व ५ नोव्हेंबर शनिवार व रविवार या दोन दिवशी सायंकाळी ३ ते १० या वेळेत करण्यात आले आहे.

कोकण म्हटलं की आठवतो सुंदर निसर्ग आणि त्या रम्य निसर्गाच्या कुशीत वसलेली पुरातन मंदिरे आणि निळाशार अथांग समुद्राचे धवल सुंदर असे किनारे. सागराचे सान्निध्य लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करुन देणारा महोत्सव म्हणजे रापण मोहोत्सव 2023 चे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले आहे.

या महोत्सवाची वैशिष्ट्ये स्थानिक मच्छीमारांसोबत मासे पकडण्याचा अनुभव , रापण ओढायचा आनंद , रापणीच्या जाळ्यात सापडलेले ताजे मासे वेचने व त्या मिळालेल्या ताज्या माश्यांचे विविध पदार्थ चवीने चाखण्यासाठी कुणकेश्वरच्या सागर किनारी आवर्जून यावे. त्याच बरोबर कोकणी पद्धतीचे शाकाहारी जेवण , उकडीचे मोदक, अळूवडी, सहित. प्रदार्थ ही सोबत चाखायला मिळणार आहेत. रापण महोत्सव 2023 ला कुणकेश्वर मध्ये रापणीचा आगळा वेगळा आनंद अनुभवायला. पर्यटकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.