
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचा गौरवशाली शिवइतिहास घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने,कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तुत्वाने! त्यात कर्त्या स्त्रियांचा देखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे जगातील सर्वात मोठी स्त्री योद्ध्या महाराणी ताराराणी! स्वराज्याची वीरांगणा, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा आता मराठी रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला असून या नाटकाचा निर्माता म्हणून मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया रणरागिणी ताराराणी नाटक निर्माता ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित रणरागिणी ताराराणी या नाटकाचा शुभारंभ चंद्रकांत (अण्णा) सावंत यांचे मार्गदर्शनाखाली 19 फेब्रुवारीला २०२५ रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे झाला. आता हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात सादर केले जाणार असून सिंधुदुर्गमध्ये दिनांक १२ एप्रिल कणकवली, १३ मालवण, १४ कुडाळ व १५ सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
ताराराणीचा इतिहास जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचा प्रचंड पराक्रम नव्या पिढीपर्यंत येणे गरजेचे आहे. आपला दैदीप्यमान इतिहास जगभरात पोहचावा या उद्देशाने मी या नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. मराठेशाहीचे स्थैर्य आणि छत्रपती ताराराणी यांनी समर्थपणे राखलेली मराठेशाहीची गादी यावर आधारित असलेल्या 'रणरागिणी ताराराणी' या नाटकात 50 कलाकारांची फौज आहे. सिंधुदुर्गच्या रंगमंचावर या नाटकाचे देखणे प्रयोग पहायला मिळणार असून नाट्य रसिकांना एक वेगळा आनंद मिळेल.
ऐतिहासिक संदर्भ घेत हा प्रेरणादायी लढा नाट्य रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्य रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महाराणी ताराराणींचे हे 350 वे जयंती वर्ष आहे. आज महिला सक्षमीकरणाबाबत बोलतो, पण महिलांसाठी कठीण असलेल्या त्या काळात स्वराज्याच्या लढ्यासाठी त्या उभ्या राहिल्या. विधवा झाल्यावरही स्वराज्याचा लढा सुरूच ठेवला. औरंगजेबाला धडकी भरवणारी महाराणी म्हणजे ताराराणी. आत्ताच्या पिढीने एकदा का होईना हे नाटक अवश्य बघायलाच हवे असे आवाहन नाट्य रसिकांना करण्यात येत आहे.