
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी ग्रंथालयात नामवंत ग्रंथपाल व "आधुनिक भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक" म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक राजेंद्र वारे व शिल्पा राजेशिर्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या विशेष दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध महान नेते, समाजसुधारक व प्रेरणादायी व्यक्तींची चरित्रे वाचून त्यांचे सारांश लेखन केले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला चालना मिळाली तसेच वाचनाची गोडी आणि ज्ञानार्जनाची वृत्ती अधिक बळकट झाली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रंथालयात चरित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांची माहिती सादर केली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व आयोजनासाठी अनुष्का काजरोळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करणे, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांविषयी आदरभाव निर्माण करणे आणि ग्रंथालयाचा उपयोग अधिक प्रभावीपणे करण्याची प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला.