
सावंतवाडी : तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपात राज्यातील पहिली युती कोकणात झाली. या युतीच्या पॅनलची अधिकृत घोषणा करण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे एकत्र येताना पहायला मिळणार आहे.
तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक १२ नोव्हेंबरला होत असून १४ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी युतीच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, उद्या युतीच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलची अधीकृत घोषणा होणार असून राजवाडा पाटेकर मंदीरात श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते आ. नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित राहणार आहेत.
याबाबतची माहिती जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी दिली आहे. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणुक प्रचार शुभारंभ प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना अन् भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर युतीच कोकणातील हे पहिलं शक्तिप्रदर्शन ठरणार आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत युतीचे नेतेमंडळी आपली भूमिका स्पष्ट करणार असून या निमित्ताने केसरकर आणि राणे एकत्र येणार असल्यानं राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे.