
मंडणगड : सार्वजनीक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात वैयक्तीक पातळीवर जाऊन हिन टिका करणारे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात भाजपा मंडणगड यांच्यावतीने निषेधाचे आंदोलन करण्यात आले. 20 ऑगस्ट 2024 रोजी पार्टीची भिंगळोली येथील कार्यालयाबाहेर निषेधाच्या घोषणा देत करण्यात आलेल्या या आंदोलनास तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिगवण, गिरीष जोशी, भावेश लाखन, ओंकार हळदवणेकर, विजय दरिपकर, मकरंद रेगे, यश मेहता, श्रीकृष्ण साठे, महेश कंचावडे, व कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे म्हणाले की निवडणुका आल्या की माजी रामदास कदम भारतीय जनता पार्टीवर अर्वाच्च भाषेत टिका करुन आपले राजकीय हित साध्य करण्याचा प्रयत्न करतात, लोकसभा निवडणुकीत पक्षाचा वाढलेला प्रभाव लक्षात घेता त्यांनी आमचे पार्टीचे नेतृत्वावर राजकीय इर्षे पोटी नव्याने आरोप प्रत्यारोप केले आहेत. सार्वजनीक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर तर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. यापुढील काळात असे आरोप खपवून घेतले जाणार नसल्याचे संकेत पार्टीचे जिल्हा नेतृत्वाने दिले आहेत. त्यानुसार दापोली मतदार संघात आमचे कार्यकर्ते त्यांचा विरोध करत आहेत याशिवाय आमदार योगेश कदम यांना आम्ही स्थानीक पातळीवर वेळोवेळी सहकार्य केले आहे. महायुतीचा आम्ही नेहमीच सन्मान केला आहे. मात्र माजी मंत्री रामदास कदम यांचे धोरण लक्षात घेता या पुढील काळात आम्हाला स्थानीक पातळीवर युती करण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे प्रतिक्रीया देताना जिल्हापातळीवर याबाबत निर्णय झाल्याचे सांगीतले.
तालुका अध्यक्ष अप्पा मोरे यावेळी म्हणाले की पक्ष म्हणून काम करण्याचा, मोठे होण्याचा अधिकार आम्हालांही आहे. भाजपाचे कार्यकर्ते स्वावलंबी आहेत ते कोणाचे पगारी नोकर नाहीत. आमचे नेते रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा अध्यक्ष केंदार साठे यांच्यावरील टिका या पुढील काळात खपवून घेतली जाणार नाही ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेत उत्तरे दिले जातील. युतीचे संदर्भात जिल्हास्तरावर निर्णय झालेला आहे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची निर्णयाशी मतदार संघातील सर्व कार्यकर्ते ठाम उभे आहेत. मतदार संघात भाजपा मोठी होत आहे. पक्षाचे माध्यमातून विकास कामे होत आहेत त्यामुळे पक्षाची लोकप्रियता वाढली आहे हे न पचल्याने हिन पातळीवरचे आरोप होत आहेत पण या पुढील काळात अशा प्रकारचे वागणे व बोलणे खपवून घेतले जाणार नाही.