
मालवण : मालवण शहरातील मेढा राजकोट येथील राजकोट तिठा ते राजकोट समुद्रकिनाऱ्यावर पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची योग्य त्या पद्धतीने प्रशासन स्तरावर तपासणी करण्यात यावी. अन्यथा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मेढा राजकोट येथील काही स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागचे कनिष्ठ अभियंता तुषार एरंडे यांना नागरिकांनी निवेदन सादर केले. यावेळी मंगेश परब, प्रसाद राणे, उमाकांत मंडलिक, यश कवटकर, फ्रान्सीस नन्होना, महेश केळुसकर, अक्षय भोसले, देवेंद्र परब, मारूती भाबल, आशु फर्नांडीस, राकेश रामाडे, हेमंत रामाडे, संजय नार्वेकर, जगन्नाथ मोर्वेकर, राजेश खांदारे, गुरूनाथ जोशी, रणजित खांदारे, संतोष खांदारे, सत्यवान भोगवेकर, बत्स्याव नन्होना, गिलबर्ट फर्नाडीस यांसह मेढा व राजकोट येथील नागरिक उपस्थित होते.
नौसेना दिन पार्श्वभूमीवर पूर्ण शहरात सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजकोट मधील रस्त्याच्या दुरूस्ती व डांबरीकरणाचे काम दि. १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण पाहता त्यामध्ये डांबराचे प्रमाण अतिशय कमी दिसून येत असल्याने रस्त्यात केवळ खडीच पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे सदर रस्ता किती महिने टिकेल याबाबत साशंकता आहे. दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे मालवण नगरपरिषदमार्फत डांबरीकरण करण्यात आले होते. सदर रस्ता वर्षभरातच खड्डेमय झालेला दिसून आला. त्याचा त्रास येथील नागरिकांना सोसावा लागला. आता करण्यात आलेले डांबरीकरणही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे ठेकेदारामार्फत डांबरीकरण केलेल्या रस्त्याची तज्ज्ञ इंजिनियरमार्फत प्रशासन स्तरावर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.