
सिंधुदूर्गनगरी : शिरोडा वेळागरवाडी येथे होऊ घातलेल्या ताज प्रकल्पाचे पांचतारांकित हॉटेल होण्यासाठी आमचा विरोध नाही परंतु गेली 30 ज्या जमिनीसाठी लढा देत आहोत त्या स्थानिक लोकांशी समन्वय साधून 9 हेक्टर क्षेत्र जमीन वगळावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेने केली जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे लवकरच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचीही भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार असे माजी आमदार राजन तेली यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे आपली मागणी मांडली यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंदूर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, सल्लागार जयप्रकाश चमणकर, महादेव उर्फ भाऊ आंदूर्लेकर आदी उपस्थित होते
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ला) येथील ताज प्रकल्पासाठी त्रिसदस्यीय करारपत्रावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. यातील वृत्तांतानुसार स्थानिक भूमिपुत्रांना डावलून व पूर्णपणे अंधारात ठेवून हे करारपत्र करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
आम्ही गेली कित्येक वर्षे एकूण सुमारे ४१.६३.२० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ सुमारे ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी शासनाकडे करीत असून त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू ठेवलेला आहे. या जमिनीवर आमचा उदरनिर्वाह आहे, माड बागायत आहे, दुबार पीक येणारी शेतजमीन आहे, काजूची झाडे आहेत, तसेच राहती घरे, मांगर, शौचालये, विहीरी, धार्मिक स्थळे आहेत. म्हणूनच आम्ही सदरचे केवळ सु. ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी सुरुवातीपासून केलेली होती य ती आजही आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, या क्षेत्राखेरीज आम्हा शेतकऱ्यांकडे अन्यन्त्र कुठेही कोणतीही जमीन व उदरनिर्वाहाचे अन्य कोणतेही साधन नाही.
सर्व संबंधित मंत्री महोदय, सचिव, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पर्यटन विभाग यांचेकडे याबाबतची सविस्तर निवेदने वारंवार देऊन मागणी लावून धरली आहे. तसेच न्याय मिळण्यासाठी खाडीपात्रातील पाण्यात उतरुन जलआंदोलन, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, आझाद मैदान मुंबई येथे उपोषण अशा माध्यमातून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. तसेच दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी येथे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, पर्यटन महामंडळाचे कार्यकारी ११ संचालक, ताजग्ग्रुपचे कार्यकारी संचालक यांचेशी VC द्वारे आयोजित केलेल्या चर्चेत
संघटनेमार्फत अध्यक्ष, सचिव, सल्लागार, व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून आमची मागणी मांडली होती. परंतु प्रत्येक वेळी आम्हाला पोकळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रत्यक्षात मात्र आजमितीपर्यंत कोणताही दिलासा दिलेला नाही. शिरोडा ग्रामपंचायतीच्या दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या ग्रामसमेत या विषयावर चर्चा होऊन जोपर्यंत आम्ही मागणी केलेले ९ हे. क्षेत्र वगळण्यात येणार नाही तोपर्यत ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारच्या कामासाठी (development) कोणतीही ना-हरकत देण्यात येऊ नये असा ठराव एकमताने संमत करण्यात आलेला आहे. गावातील नागरीकांचे मत व भूमिका याची दखल घेण्यात येऊन त्याचा सन्मान राखला जावा. दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन पर्यटनमंत्री गिरीश महाजन, स्थानिक आमदार तथा माजी शिक्षणमत्री दीपक केसरकर वगैरे यांनी शिरोडा वेळागर भागात भेट दिली होती. त्यावेळी तत्कालीन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात आले असताना आम्हा शेतकऱ्यांना ९ हे. क्षेत्र वगळण्याबाबत ठोस असे आश्वासन दिलेले होते. मात्र, त्याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
शिरोडा वेळागरवाडी येथील ९ हे. क्षेत्र वगळण्याबाबत कार्यवाही करुन आम्हाला दिलासा द्यावा. व तोपर्यंत वेळागर येथील एकूण पर्यटन क्षेत्रात कोणतेही काम सुरु करण्यात येऊ नये किंवा तशी परवानगी कोणत्याही कंपनीस देण्यात येऊ नये. यासाठी जिल्हास्तरावरून योग्य ती सकारात्मक कार्यवाही व्हावी. तसेच आवश्यक त्या सर्व सबंधित वरिष्ठ कार्यालयांकडे आमचे म्हणणे शिफारशीसह पोहोचवून आमच्या या निवेदनाचा अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करुन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेने केली जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.










