
दोडामार्ग : अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा "राज्यस्तरीय लोकराज्य राजर्षी शाहू गौरव पुरस्कार" घोटगेवाडी ता. दोडामार्ग येथील कीर्ती विद्यालय घोटगेवाडी या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सखाराम आनंदा कांबळे यांना जाहीर झाला आहे. अविष्कार फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी पुरस्कारासाठी निवडीचे पत्र दिले आहे. सखाराम कांबळे हे गेले वीस वर्षे इंग्रजी इतिहास विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांची इंग्रजी विषयाच्या अध्यापनाबरोबरच उत्कृष्ट चित्रकला, रांगोळी, सूत्रसंचालन व सुंदर हस्ताक्षर काढण्यामध्ये ख्याती आहे. ते तेरा वर्षे सहाय्यक शिक्षक व सात वर्ष प्र. मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत.कीर्ती विद्यालय घोटगेवाडी ही प्रशाला एक दर्जेदार शिक्षण देणारी व गेली तेरा वर्षे सतत दहावीचा शंभर टक्के निकाल लावणारी शाळा म्हणून दोडामार्ग तालुक्यात ओळखली जाते. तसेच शासकीय रेखाकला परीक्षेस मुलांना बसवून प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागतो. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली असून ते दोडामार्ग तालुका मुख्याध्यापक संघाचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. सखाराम कांबळे यांना यापूर्वी दोडामार्ग तालुका अध्यापक संघाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, शिक्षक भारती सिंधुदुर्गचा तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, सह्याद्री शिक्षण मंडळ घोटगेवाडी या संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार व गेल्या वर्षी कोटा अकॅडमी गडहिंग्लज सेंटर व लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज चा लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल त्यांचे सह्याद्री शिक्षण मंडळ घोटगेवाडीचे अध्यक्ष मोहन शिरोडकर व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. या त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पुरस्काराचे वितरण 30 जून रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात होणार आहे.