LIVE UPDATES

नियतीचा कुटील डाव | कुटुंबावर घातला घाव

नाणार इंगळवाडीत खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 12, 2026 11:20 AM
views 42  views

राजापूर : राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे रविवारी (११ ऑक्टोबर) दुपारी काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. खाडीत आई-वडिलांसोबत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच कुटुंबातील पाच मुले खोल पाण्यात बुडाली. या दुर्घटनेत एका मुलासह तीन मुली अशा चार भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, एका मुलीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नाणार परिसरात शोककळा पसरली आहे.

खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, नाणार इंगळवाडी येथील जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या रविवारी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलांसह खाडीमध्ये मुळे (कालवे) काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील खाडीपात्रात कालवे काढत असताना, सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास पाचही मुले खाडीतील खोल पाण्यात बुडाली.

खाडीपात्रातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मुले पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी एका मुलीला वाचविण्यात यश आले; मात्र अन्य चार भावंडांना वाचविता आले नाही.

तिघांचे मृतदेह हाती ; एका मुलीचा शोध सुरू

या दुर्घटनेत मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे) आणि बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे) या तिघांचा बुडून मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे) या मुलीचा शोध सुरू आहे. एकाच कुटुंबातील चार लहान मुलांवर काळाने घाला घातल्याने भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नाणार परिसर सुन्न झाला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांसह ग्रामस्थांकडून शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या मदतीने बचावकार्य व शोधमोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, या दुर्घटनेमुळे परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.