राजन तेली यांच्या 'त्या' वक्तव्याचा जिल्हा पत्रकार संघाने केला निषेध!

साईनाथ गावकर यांच्याबाबत केले होते विधान
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 20, 2022 12:49 PM
views 442  views

सावंतवाडी : जिल्हा पत्रकार संघाचे सभासद पत्रकार साईनाथ गावकर यांच्याबाबत जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी जे निषेधार्य वक्तव्य केले आहे ते निंदनीय आहे. ते वक्तव्य सर्वच पत्रकारांचा अपमान आणि खच्चीकरण करणारे आहे. त्यामुळे या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ जाहीर निषेध करत असून उद्याच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत राजन तेली यांच्या वक्तव्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

    दरम्यान,  राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबतचा जो एकेरी उल्लेख केलेला आहे त्याचाही निषेध सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ करत आहे. या दोन्ही आक्षेपार्ह घटनांची सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून याबाबतचा योग्य निर्णय उद्या होणाऱ्या जिल्हा कार्यकारणीच्या सभेत  घेण्यात येणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

       जिल्हा मुख्यालयाच्या पत्रकार कक्षात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  या पत्रकार परिषदेसाठी संघाच्या सचिव देवयानी वरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर,परिषद प्रतिनिधी गणेशाय जेठे,मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर,सचिव मनोज वारंग, नंदकुमार आयरे, संदीप गावडे, दत्तप्रसाद वालावलकर,विनोद दळवी, विनोद परब,लवू महाडेश्वर, गिरीश परब, सतीश हरमलकर, तेजस्वि काळसेकर,  आदी पत्रकार उपस्थित होते.

     याबाबत एक निवेदन उद्या जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून  त्या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही  पाठवण्यात येणार आहे.

     गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारांवर होणारा अन्याय तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले याबाबत जिल्हा पत्रकार संघाने वारंवार आवाज उठवलेला होता.या घटनेच्या अनुषंगाने राजन तेली यांना जर साईनाथ गावकर यांनी दिलेल्या बातमी संदर्भात काही आक्षेपार्ह वाटले असते तर त्यांनी त्याचा खुलासा देणे आवश्यक होते.अगर आवश्यक वाटल्यास  कायदेशीर मार्गाने दाद मागू शकले असते.मात्र तसे न करता  त्यांना दूरध्वनीवरून अत्यंत गलिच्छ भाषेत बोलून त्यांना धमकावणे  व शिवीगाळ करणे हे निश्चितच राजन तेली यांच्या सारख्या एका प्रमुख पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला शोभनिय नाही. हे आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे.

        चंद्रकांत दादा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, जे सर्वच पत्रकारांचे आराध्य दैवत आहे, यांच्याबाबत एकेरी उल्लेख करून ती घटना एका मीडियासमोर मांडली आहे. ते देखील निंदनीय असून जिल्हा पत्रकार संघ याचा नेहमीच निषेध करेल. भविष्यात याबाबत सरकारने गंभीर  दखल घ्यावी अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाने केली आहे.

      पत्रकार साईनाथ गावकर यांच्या पाठीशी जिल्हा पत्रकार संघ अत्यंत ठामपणे उभा असून त्यांना भविष्यात यासंदर्भात पूर्णपणे सहकार्य आणि मदत केली जाईल असेही अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी सांगितले.