भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता शालेयशिक्षणमंत्र्यांकडून भूमिपूजनं

राजन तेलींचा टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2024 16:10 PM
views 542  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास कामासाठी मिळणारा निधी हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याच माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे कुणी कितीही भुमिपूजन आणि उद्घाटने केली तरी येथील जनता  फसणार नाही असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी लगावला. तर राज्यात एकत्र सत्तेत असल्याने जिल्ह्यातील विकासकामांची उद्घाटने एकत्र येऊन केल्यास चांगले होईल असा सल्लाही त्यांनी दिला.


  तेली पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन डोंगरी विकास आणि 25-15 च्या माध्यमातून तब्बल 19 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या ठिकाणी डोंगरी विकासच्या माध्यमातून जिल्ह्यातील किनारपट्टीला निधी मिळत नव्हता. परंतु, यावेळी हा निधी किनारपट्टीला देण्याचा प्रयत्न आहे. तसेच जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेतील एकही गाव या विकास निधीपासून चुकू नये याची खबरदारी ही घेतली जात आहे‌. मुळात जिल्हा नियोजन च्या माध्यमातून गेल्यावर्षी आणि यावर्षीही प्रत्येक ग्रामपंचायतीला विविध विकास कामांसाठी पैसे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पोहचले आहेत. गावागावातून जनतेच्या अनेक मागणी आहेत. सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तेथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी बजेटच्या माध्यमातून कामांना निधी मिळावा त्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे अजून विकास कामे मार्गी लागणार आहेत. तर आज राज्यात एकत्र सत्तेत असताना मित्रपक्षांकडून विकास कामाचे भूमिपूजन करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. मात्र, विकासकामांना मिळणारा निधी हा पालकमंत्र्यांच्याच सहीने मिळतो, हे न समजण्याएवढी येथील जनता खुळी नाही. त्यामुळे कुणी कितीही उद्घाटने केली तरी जनता फसणार नाही. मुळात जिल्ह्याचा विकास करत असताना राज्यातील एकत्ररित्या असलेल्या सत्तेचा विचार करता येथील आमदार तथा शालेय शिक्षणमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकत्ररित्या भूमिपूजन केली पाहिजे. तसे झाल्यास निश्चितच चांगले होईल. आज जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न बिघडला असला तरी लवकरच तो सुधारला जाईल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून याकडे बारकाईने लक्ष दिला जात आहे. त्यामुळे लवकरच येथील जनतेला चांगली आरोग्य सुविधा निश्चितच मिळणार आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम करणाऱ्या अनेक ठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामांची बिले मिळत नसतील तर त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. आम्ही याबाबत निश्चितच तोडगा काढू असं ते म्हणाले.


तर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दीपक केसरकर यांनी युतीधर्म न पाळता भाजपा कार्यकर्त्यांवर निधी वाटपात अन्याय केला होता. परंतु, आताचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे

निधी वाटपात सर्वांना समान न्याय देत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास हा रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातूनच होत असल्याचे राजन तेली म्हणाले.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, निशांत तोरस्कर आदी उपस्थित होते.