...तर केसरकरांना धडा शिकवावा लागेल : राजन तेली

Edited by: विनायक गांवस
Published on: November 16, 2024 20:50 PM
views 417  views

सावंतवाडी : रोप वे, ट्राय ट्रेन सोडाच सावंतवाडी शहरातून जाणारा संकेश्वर रेडी हायवे बाहेरून नेण्याचे पाप केसरकरांनी केले आहे. त्यामुळे सावंतवाडीचे गतवैभव आणायचे असेल तर त्यांना धडा शिकवावा लागेल असा इशारा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी दिला.

एकीकडे धमक्या आणि दुसरीकडे पैशाचा पाऊस पाडण्याची वेळ त्यांच्यावर  आली आहे. केसरकरांनी पंधरा वर्षात विकास केला तर ही वेळ त्यांच्यावर का आली ? याचे उत्तर केसरकरांनी द्यावे असाही सवाल त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,दिलीप नार्वेकर,महेंद्र सांगेलकर,निशु तोरसकर,आशिष सुभेदार,योगेश वाडकर आदी उपस्थित होते. सावंतवाडी तालुक्यासह शहरात तेली यांच्या प्रचारार्थ बैठक घेण्यात आली. शहरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री तेली म्हणाले, सावंतवाडी मतदार संघात भयमुक्त काम करण्यासाठी दहशतवाद करणार्‍या प्रवृत्तीला घरी बसविण्याची वेळ आली आहे.याठिकाणी रस्ते,दिवे लावले म्हणून मतदार संघाचा विकास केला असा होत नाही. केसरकरांनी वारंवार भूमिका बदलून मतदारांची दिशाभूल करून आपला स्वार्थ साधला आहे.त्यामुळे याठिकाणी भरीव काम करण्याबरोबर मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी  निवडणूक रिंगणात उतरलो आहे.त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा साथ द्या,  तुमच्या मनातील विकास झालेला याठिकाणी दिसेल असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, गेली पंधरा वर्षे आमदार असताना केसरकरांनी सावंतवाडी मतदार संघात केलेले एक तरी ठोस काम केले आहे का ? स्थानिक आमदार तुम्हाला भेटतात का ? असे अनेक प्रश्न उपस्थित करत तेली हे प्रशासनातील अनुभवी उमेदवार आहेत. या मतदारसंघाचा विकास करण्याची त्यांची क्षमता आहे त्यामुळे त्यांना एकदा संधी द्या मशाल या चिन्ह समोर बटन दाबून उबाठा शिवसेनेला मतदान करा असे आवाहन उपस्थितांनी केले.