
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असलेले राजन तेली यांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेनेच्या मुंबई येथील मेळाव्यात हा महत्त्वाचा प्रवेश पार पडला. राजन तेली यांच्या या पक्षप्रवेशामध्ये सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.
राजन तेली यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गटाला) मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, तेली यांचा शिंदे गटातील प्रवेश हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपला देखील एक प्रकारे धक्का मानला जात आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वासाठी हा एक महत्त्वाचा राजकीय बदल असून, आगामी काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश सिंधुदुर्गचे राजकीय समीकरण निश्चितपणे बदलणारा ठरू शकतो.