पेंडुर तलाठी कार्यालयाचे राजन तेलींच्या हस्ते उदघाटन !

Edited by: दिपेश परब
Published on: January 11, 2024 07:03 AM
views 132  views

वेंगुर्ले : तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्यासाठी नुसता विकास होऊन चालत नाही तर राज्य व केंद्र शासनाच्या छोट्या छोट्या योजना लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत. ग्रामपंचायत ने सुद्धा राज्य व केंद्रशासनच्या वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन बक्षिसे मिळवावीत. सरपंच ही एक मोठी ताकद आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केलं तर लोक पाठीमागे राहतात. गावातील विकासकामांच्या मागण्या निश्चितच पूर्ण होतील. या पेंडूर गावाला एक वेगळी धार्मिक पार्श्वभूमी आहे. आज संतोष गावडे यांचही गावासाठी मोठं योगदान असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजन तेली यांनी पेंडूर येथे केले. 

      पेंडूर ग्रामपंचायत कार्यालय वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज बुधवार १० जाने रोजी पेंडूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गेली काही वर्ष प्रलंबित असलेला पेंडूर तलाठी कार्यालयाचे उदघाटन राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडी तहसीलदार श्री.मुसळे, पेंडुर सरपंच संतोष गावडे, तलाठी किरण गजनीकर, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद इंगळे, उपसरपंच महादेव नाईक, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गावडे, दीपक कवठणकर, निलेश वैद्य, समिक्षा तांडेल, सुलोचना परब, प्रणिता सावंत, सुहासिनी वैद्य, रंजना हर्जी, ग्रामपंचायत कर्मचारी वैशाली नाईक, घनश्याम नाईक तसेच सर्व शासकीय कर्मचारी, गावातील महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

   यावेळी बोलताना सरपंच संतोष गावडे म्हणाले की, पेंडूर गावचे विभाजन होऊन २००२ नंतर ग्रामपंचायत इमारत चा प्रश्न भेडसावत होता. यानंतर ग्रामपंचायत साठी प्रयत्न सुरू झाले २०१३ मध्ये ग्रामपंचायत इमारत झाली. शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तलाठी कार्यालय महत्वाचे असते. ८ ते ९ किमी मातोंड गावात तलाठी कार्यालय असल्याने शेतकरी व वृद्धांना याचा त्रास होत होता. आज पेंडूर गावात तलाठी कार्यालय होत आहे. याच सर्व श्रेय राजन तेली यांना जाते. त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी सरपंच गावडे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद इंगळे यांनी केले.