
सावंतवाडी : चार ते पाच वेळा पक्ष बदलून देखील जनतेने वारंवार नाकारलेल्या राजन तेली यांना आता स्वतःचे राजकीय भवितव्य धोक्यात दिसू लागले आहे. त्यामुळेच आता पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करून काहीतरी हाती लागेल यासाठी त्यांची ही धडपड आहे. मात्र, राजकारण व सहकारातूनही जनतेने हद्दपार केलेल्या तेलींनी आता तरी शांत बसावे अन्यथा त्यांचे कारनामे उघड करावे लागतील असा इशारा जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा माजी जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी दिला आहे.
कळसुली मतदारसंघातील जिल्हा परिषदमधील पराभवानंतर राजन तेली यांना माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली. त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देखील दिले. मात्र, विधानसभेवर निवडून येण्याचे दिवास्वप्न पाहत कणकवली सोडून सावंतवाडी मतदारसंघात दाखल झालेल्या राजन तेलींना सावंतवाडीकरांनी चक्क तीन वेळा आसमान दाखवले. यासाठी तेलींनी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा पक्ष बदलला. मात्र, त्यांचे मनसुबे उधळून लावले गेले. तर नारायणराव राणे यांचा वरदहस्त बाजूला होताच सहकारातही त्यांना नेहमीच मात खावी लागली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सलग दोन वेळा मोठ्या फरकाने त्यांना पराभूत व्हावे लागले. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपला दगा देऊन उबाठात प्रवेश केलेल्या राजन तेलींना पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
त्यामुळेच सैरभैर झाल्याने राजन तेली आता पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, जिल्ह्यातील जनता त्यांना चांगलेच ओळखत असून त्यांना आता जनता कधीही थारा देणार नाही, अशी टीकाही गुरुनाथ पेडणेकर यांनी केली आहे. राजन तेली यांनी नेहमीच गटातटाचे राजकारण केले. शिवसेनेत त्यानंतर काँग्रेसमध्ये व भारतीय जनता पार्टीत असताना देखील स्वतःचा राजकीय फायदाच त्यांनी पाहिला. मात्र तेथे राहूनही आपले राजकीय स्वप्न साकार होणार नसल्याचे ध्यानात येतात महायुतीच्याच आमदारांवर सातत्याने टीका करून आपले अस्तित्व निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, पक्षाने संधी नाकारल्याने अखेरीस नेहमीप्रमाणे पक्ष बदलून निवडणूक लढवली मात्र तेथेही जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. आता ना घर का ना घाट का अशी केविलवाणी परिस्थिती झालेल्या राजन तेलींनी शांत राहणेच योग्य असल्याचा सल्लादेखील गुरुनाथ पेडणेकर यांनी दिला आहे.