
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी शिवसेना उबाठा पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सावंतवाडी मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात विकास न झाल्यामुळे हा मतदारसंघ विकासापासून मागे राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे असं श्री तेली यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले, एखादा रोजगार देणारा प्रकल्प या ठिकाणी महत्त्वाचा असणारा आरोग्याचा प्रश्न केसरकर सोडवू शकले नाही. या ठिकाणच्या भोळ्या भाबड्या जनतेचा फायदा घेऊन पंधरा वर्षे असलेले आमदार आणि त्यातील आठ वर्ष असलेले मंत्रीपदाचा फायदा त्यांनी आपल्या कुटुंबाला केला आहे. येथील जनतेच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष न दिल्यामुळे मतदारात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे अशा अपप्रवृत्तीला आणि साईबाबांचे नाव घेऊन खोटं बोलणाऱ्यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे या मतदारसंघात मी निवडून आल्यानंतर या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी काम करणार आहे. येत्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर येत्या सहा महिन्यात रोजगार देणारा एक तरी प्रकल्प मी या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं तेली म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, मंदार शिरसाट, मायकल डिसोजा, महेंद्र सांगेलकर, चंद्रकांत कासार, रेवती राणे, साक्षी वंजारी, रमेश गावकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रविण भोसले म्हणाले, केसरकर हे निष्क्रिय आमदार आहेत या ठिकाणच्या जनतेवर त्यांनी अन्याय केलेला आहे. त्यामुळे आज ठाकरे शिवसेनेच्या या रॅलीला प्रचंड उत्साह लाभला आहे. रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी मोठा असताना त्यांना या ठिकाणच्या युवकांची काळजी केसरकर यांना नाही श्री तेली यांचे काम चांगले आहे. या ठिकाणच्या मतदारसंघात ते गेली तीस वर्ष काम करीत आहेत त्यांना मतदारसंघाचा अभ्यास आहे. दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांची आज ओळख आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणचा आमदार बनवून विधानसभेत पाठवूया आणि त्यांच्या हातून या ठिकाणी विधायक कार्य घडो असेही श्री भोसले यांनी सांगितले. श्री साळगावकर म्हणाले, केसरकर ज्या गावात फिरतील त्या गावातील मतदारांनी तुम्ही घोषणा दिलेले त्याचे काय झाले असा जाब प्रत्येक मतदाराने विचारला पाहिजे. या ठिकाणी निवडणुकी पूर्वी अनेक घोषणा केलेले आहेत मात्र या फसव्या घोषणा करून येथील जनतेची केली आहे. त्यामुळे येथील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच घरी बसवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.